एकाच दिवशी दोन गुंडांना केले स्थानबद्ध; पोलिस आयुक्त रितेशकुमार ॲक्शन मोडमध्ये
By विवेक भुसे | Published: July 9, 2023 03:21 PM2023-07-09T15:21:07+5:302023-07-09T15:24:39+5:30
पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर आतापर्यंत २९ गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई
पुणे: शहरातील वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलिसआयुक्त रितेशकुमार हे आता ॲक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी एकाच दिवशी दोन गुंडांवर एम पी डी ए खाली कारवाई करुन त्यांना स्थानबद्ध केले आहे. एकाच दिवशी एकावेळी दोन गुंडांना स्थानबद्ध करण्याची ही पहिली वेळ आहे.
समीर राहुल हतांगळे (वय २२, रा. महालक्ष्मी बिल्डिंग, दांडेकर पुल) आणि शुभम ऊर्फ ताया सुनिल दुबळे (वय २१, रा. चिंतामणी सोसायटी, मानाजी नगर, नर्हे) अशी या दोन गुंडांची नावे आहेत. समीर हतांगळे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या परिसरात लोखंडी रॉड, धारदार हत्यारांसह खूनाचा प्रयत्न, बेकायदेशीरपणे हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील ५ वर्षात त्याच्याविरुद्ध ३ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दहशतीमुळे तक्रार देण्यास कोणी पुढे येत नाहीत. दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे व पी सी बीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी प्रस्ताव पाठविला होता.
शुभम दुबळे याने त्याच्या साथीदारांसह चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या परिसरात तलवार, लोखंडी रॉड, लाकडी दांडके, बॅट अशा हत्याराने खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दुखापत करणे असे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील ५ वर्षात त्याच्याविरुद्ध ५ गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे आणि पी सी बी गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांनी स्थानबद्धतेचा प्रस्ताव पाठविला होता. पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी या प्रस्तावाची पडताळणी करुन शुभम दुबळे याला अमरावती कारागृहात तर समीर हतांगळे याला नागपूर कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला. पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर आतापर्यंत २९ गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.