पुणे ड्रग्ज प्रकरण; ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना अटक, असं आहे कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 09:01 AM2023-10-19T09:01:14+5:302023-10-19T09:04:23+5:30
या दोघींनाही आज पुणे न्यायलायात हजर करण्यात येणार आहे.
पुणे ड्रग्ज प्रकरणात ललित पाटीलच्या अटकेनंतर आता त्याच्या दोन मैत्रिणींनाही अटक करण्यात आली आहे. प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम अशी या दोघींची नावे आहेत. ससून रुग्णालयातून पसार झाल्यानंतर ललित सातत्याने या दोघींच्या संपर्कात होता.
ससून रुग्णालयातून पळून जाण्यासाठी या दोघींनीच त्याला मदत केल्याचेही बोलले जात आहे. फरार असल्याच्या काळात तो सातत्याने या दोघींच्या संपर्कात होता. महत्वाचे म्हणजे, ड्रग्जच्या काळ्या कमाईतून मिळवलेला पैसाही ललित पाटीलने या दोघींकडे ठेवल्याचीही माहिती आहे.
पोलिसांनी बुधवारी रात्रीच्या सुमारास नाशिक शहरातून प्रज्ञा आणि अर्चना या दोघींनी अटक केली. या दोघींनाही आज पुणे न्यायलायात हजर करण्यात येणार आहे.
फरार झाल्यानंतर पहिल्यांदा नाशकात आला होता ललित पाटील -
पुण्याहून फरार झाल्यानंतर तो थेट नाशकात आला आणि येथील त्याच्या निकटवर्तीय महिलेकडे रात्रभर मुक्काम ठोकला होता. तिच्याकडून २५ लाखांची रोकड घेऊन तो नाशकातून बाहेर पडला, अशी माहिती नाशिकपोलिसांच्या तपासातून समोर आली आहे.
बंद कारखान्यांमध्ये तयार करायचे ड्रग्ज -
- प्रामुख्याने मॅफेड्रोन हे ड्रग्ज बाहेरच्या देशातून भारतात आणले जाते. ललितकडे मात्र हे ड्रग्ज बनवण्यासाठी तज्ज्ञांची टीम होती. त्याचा भाऊ भूषण ‘एमडी’ उत्पादन करत असल्याचे समोर आले.
- ललितने याआधी रांजणगाव येथील कारखान्यात १३२ किलो मॅफेड्रोन बनविले होते, त्यातील ११२ किलो मॅफेड्रोन त्याने विकले होते, तर २० किलो पोलिसांना सापडले होते.
- पुढे ललित, भूषण यांच्या नाशिक येथील शिंदे गावातील कारखान्यावर पोलिसांनी छापा मारत ३०० किलोचे एमडी जप्त केले.