मैत्रिणीनेच अपहरण केलेल्या दोन मुलींची सुटका
By admin | Published: June 22, 2017 07:18 AM2017-06-22T07:18:45+5:302017-06-22T07:18:45+5:30
शहरातून अपहरण झालेल्या दोन मुलींची पोलिसांनी दोन दिवसांत सुटका करण्यात यश मिळविले. पोलीस उपनिरीक्षक अनिता होडगे यांनी प्रसंगावधान राखून पाठलाग
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर : शहरातून अपहरण झालेल्या दोन मुलींची पोलिसांनी दोन दिवसांत सुटका करण्यात यश मिळविले. पोलीस उपनिरीक्षक अनिता होडगे यांनी प्रसंगावधान राखून पाठलाग करून अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतले. अपहरण करणारी या दोन मुलींची मैत्रीणच असल्याचे मुलींच्या जबाबातून स्पष्ट झाले आहे.
वृषाली दुडे (रा. पाथर्डी, जि. अहमदनगर) व सचिन आगवणे (रा. मूळ बारामती) अशी अपहरणकर्त्यांची नावे आहेत. पूजा आगरवाल व कविता तीखारती या महिलांनी १६ जून रोजी मुलींच्या अपहरणाची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. यात वृषाली दुडे हिच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता. याप्रकरणी पोलीस निरीक्षक होडगे यांच्याकडे तपास होता. १७ जून रोजी पूजा आगरवाल यांना सचिन आगवणे याचा कॉल आला. ‘तुमच्या मुलीच गाठ घ्यायची असेल, तर तुम्ही बाह्यवळण मार्गावर या. तिची इच्छा असेल तर सोबत घेऊन जा,’ असे आगवणे याने आगरवाल यांना सांगितले. हा फोन सुरू असताना आगरवाल या सामाजिक कार्यकर्ते प्रताप थोरात यांच्या कार्यालयात होत्या. थोरात यांनी उपनिरीक्षक होडगे यांच्याशी संपर्क साधला. यावर होडगे दोन पोलीस शिपायांसह साध्या वेशात बाह्यवळण मार्गावर गेल्या. त्या वेळी थोरात तसेच जयवंत साळुंके हेदेखील त्यांच्यासमवेत होते. मात्र आगवणे तेथून पळाला. बस स्थानकात शोध घेतला असता वृषाली व सचिन दोघेही तेथे मिळून आले. पोलिसी हिसका दाखविल्यावर मुलींना एसटीत बसवून शिरूरच्या दिशेने पाठविल्याचे वृषालीने सांगितले. यानंतर मुलींनी दिलेल्या जबाबावरून वृषाली व सचिन आगवणे यांच्यावर फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला. या दोघांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. यात सचिनचा जामीन झाला.