कपडे धुवायला गेलेल्या दोन मुलींचा पाय घसरून धरणात मृत्यू, बुलढाणा जिल्ह्यातील सर्व मुली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 02:00 PM2023-05-15T14:00:40+5:302023-05-15T14:01:15+5:30

बुलढाण्यातील मुली खडकवासला धरणाच्या तीरावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. तिथे पाय घसरून पाण्यात पडल्या

Two girls who went to wash clothes died after slipping in the dam | कपडे धुवायला गेलेल्या दोन मुलींचा पाय घसरून धरणात मृत्यू, बुलढाणा जिल्ह्यातील सर्व मुली

कपडे धुवायला गेलेल्या दोन मुलींचा पाय घसरून धरणात मृत्यू, बुलढाणा जिल्ह्यातील सर्व मुली

googlenewsNext

पुणे : एका नातेवाईकांकडे लग्नसमारंभ आणि नामकरण कार्यक्रमानिमित्त गोऱ्हे खुर्द गावात आलेल्या बुलढाण्यातील मुली खडकवासला धरणाच्या तीरावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. तिथे पाय घसरून पाण्यात पडल्या. त्यात दोन तरूणींचा मृत्यू झाला आहे, तर इतर सात जणींना स्थानिकांनी वाचविले आहे. खुशी संजय खुर्दे (वय १३, रा. सोळकी, जि. बुलढाणा ), शीतल भगवान टिटोरे (वय १५, रा. आंबेडझरी, ता.जि. बुलढाणा) असे बुडून मृत्यू झालेल्या दोघींची नावे आहेत.

या वेळी कुमुद संजय खुर्दे ( वय ७, रा. बुलढाण), पायल संजय लहाणे (वय १८, रा बुलढाणा ), शीतल अशोक धामणे (वय १६ जळगाव), राखी सुरेश मांडवे (वय १६, बुलढाणा ), पायल संतोष साळवे (वय १८, रा. सुरत, गुजरात), मीना संजय लहाणे (वय ३० बुलढाणा ), पल्लवी संजय लहाणे (वय १० बुलढाणा ) या मुलींना वाचविण्यात यश आले.

संजय नारायण लहाणे हे गोऱ्हे खुर्द गावात ग्रीन थंब संस्थेत वॉचमनचे काम करतात. खडकवासला धरण तीरावर लावलेल्या झाडांची निगराणी करण्याचे काम त्यांच्याकडे आहे. तिथेच संस्थेने दिलेल्या झोपडीवजा घरात ते आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांच्या नातेवाईकांचे लग्न समारंभाच्या कार्यक्रमानिमित्त आणि एका नातेवाईकाच्या मुलाच्या बारशानिमित्त घरी काहीजण आले होते. त्या नातेवाईकांपैकी नऊ मुली धरण तीरावरील घरात राहावयास रविवारी रात्री आल्या होत्या. सोमवारी (दि.१५) सकाळी नऊच्या दरम्यान या सर्व मुली कपडे धुण्यासाठी धरण तीरावर गेल्या असता त्यातील एकीचा पाय घसरून ती पाण्यात पडली. पाणी खोल असल्याने तिला वाचवण्यासाठी बाकीच्या सात जणींनी आरडाओरडा करत तिला धरण्याचाही प्रयत्न केला असता त्याही पाण्यात गेल्या. आरडाओरडा झाल्याने याच वेळी जवळच असलेल्या स्मशानभूमीत सावडण्याचा कार्यक्रम सुरू होता. तिथे गोरेखुर्द आणि झाळणवाडी गावचे ग्रामस्थ जमले होते. यापैकी संजय सीताराम माताळे आणि रमेश नामदेव भामे या दोन तरुणांनी प्रसंगावधान राखत घटनास्थळी धाव घेऊन सात मुलींना वर काढले. परंतु दोघींना वाचवता आले नाही.

घटनेची माहिती कळताच हवेली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम आणि पोलीस हवलदार विलास प्रधान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी माहिती घेतली. तोपर्यंत अग्निशामन दलाचे प्रमुख सुजित पाटील जवानासह आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी येऊन बुडालेल्या दोन मुलींचा शोध घेतला. त्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रूग्णालयात पाठवण्यात आले असल्याचे नितीन नम यांनी सांगितले.

दोन तरुणांचे प्रसंगावधान

यापैकी संजय सीताराम माताळे आणि रमेश नामदेव भामे या दोन तरुणांनी प्रसंगावधान राखत घटनास्थळी धाव घेऊन सात मुलींना वर काढले. परंतु दोघींचा शोध लागला नाही. त्यानंतर गोऱ्हे खुर्द गावचे पोलीस पाटील, कालीदास तुकाराम माताळे, माजी सरपंच राजेंद्र जोरी, सचिन काळोखे, शिवाजी माताळे यांनी सातही तरुणींना त्वरित आपल्या गाडीतून जवळच्या रुग्णालयात हलवले, त्यामुळे त्यांचा जीव वाचला.

Web Title: Two girls who went to wash clothes died after slipping in the dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे