दोन गटांनी एकमेकांवर खुनी हल्ले करत माजवली दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 06:40 PM2021-03-25T18:40:43+5:302021-03-25T18:41:25+5:30
सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करीत जीवे मारण्याची दिली धमकी
पिंपरी : पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी होऊन दोन्ही गटांनी एकमेकांवर खुनी हल्ले केले. गंगानगर, आकुर्डी येथे मंगळवारी रात्री ही घटना घडली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन्ही गटातील १५ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या प्रकरणात रोशन छबुराव काळे (वय ३४, रा आकुर्डी) यांनी बुधवारी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बालाजी सातपुते, योगेश मानकेरे, श्रेयस टाकळकर, रोहित ओवाळ, आदित्य यादव, शुभम दत्तात्रय जाधव आणि त्यांचे तीन साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सातपुते आणि मानकेरे हे दोघेजण गंगाई उद्यानात नशापान करत होते. त्यावेळी फिर्यादीने त्यास हटकले. तसेच शनिवारी झालेल्या वादात मध्यस्थी केली. या रागातून आरोपीने साथीदारांच्या मदतीने फिर्यादीला जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयता व सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण करून जखमी केले. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
दुसऱ्या प्रकरणात शुभम दत्तात्रय जाधव (वय २१, रा. आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भूषण काळे, रोशन काळे, साहिल काळे, सागर कान्हूरकर, राहूल कान्हूरकर, प्रदीप गुजर, (सर्व रा. आकुर्डी), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शतपावली करण्यासाठी फिर्यादी घराबाहेर आले. फिर्यादीचा मित्र श्रेयसने केलेल्या भांडणाच्या कारणावरून तसेच श्रेयस व इतर मित्र फिर्यादीसोबत असल्याच्या कारणावरून आरोपींनी संगनमत करून शिवीगाळ केली. फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. तसेच सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करीत जीवे मारण्याची धमकी दिली.