करडे येथे जमीन मोजणीच्या वादावरून दोन गटात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:10 AM2021-04-07T04:10:18+5:302021-04-07T04:10:18+5:30
शिरूर तालुक्यातील करडे येथे जमीन मोजणीच्या कारणावरून व जुन्या वादावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ...
शिरूर तालुक्यातील करडे येथे जमीन मोजणीच्या कारणावरून व जुन्या वादावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे यांच्यासह दोन्ही गटांच्या मिळून पंधरा जणांवर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या हाणामारीमध्ये तिघांना किरकोळ मार लागला असून महिलांचाही यात समावेश आहे.
विठ्ठल रावसाहेब रोडे रा. करडे तालुका शिरूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, रणजित जगदाळे, सुरज जगदाळे, बाळासाहेब गायकवाड, रवींद्र जगदाळे यांचा मुलगा यांच्यासह चार ते पाच अनोळखी व्यक्तींविरुद्ध मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर राजेंद्र जगदाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विठ्ठल रोडे, लक्ष्मण रोडे ,जयवंत रोडे ,निखिल रोडे, लताबाई रोडे, अश्विनी रोडे, कमल रोडे, प्रतीक्षा रोडे, यांच्याविरुद्ध बेकायदा जमाव जमवून लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी हाणामारी, धमकी, शिवीगाळ केल्याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल केले आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि .५ एप्रिल रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास जगदाळे हे करडे ता. शिरुर येथील गट क्रमांक १०९ या जागेची मोजणी करण्यासाठी गेले असता. विठ्ठल रोडे यांच्या कुटुंबीयांनी त्यांना जाब विचारात मारहाण केली आहे. विठ्ठल रोडे यांच्या फिर्यादीनुसार ही जागा त्यांच्या मालकीचे आहे. जगदाळे यांनी मालकीहक्क दाखवल्याने याबाबत शिरूर न्यायालयात खटला प्रलंबित आहे. तरी या जागेची मोजणी होत असल्याने दोन गटात हाणामारी झाली. यांना मारहाणीमध्ये दोन्ही गटाकडून चाकू, कु-हाड ,लाकडी दांडके यांचा वापर झाला असून दोन्ही बाजूने परस्पर फिर्याद दिल्याने शिरूर पोलीस स्टेशन येथे हाणामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुनील मोटे हे करीत आहे.