गुरुद्वाराच्या बांधकामाचा हिशोब मागितल्यावरुन दोन गटात हाणामारी; एकाच्या खुनाचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 09:58 PM2021-02-04T21:58:09+5:302021-02-04T21:59:26+5:30
वानवडी पोलिसांनी दोन्ही गटातील १७ हून अधिक जणांवर केला गुन्हा दाखल; ६ जणांना अटक
पुणे : गुरुद्वाराच्या बांधकामाच्या हिशोब मागितल्या प्रकरणी दोन गटात तुफान हाणामारी झाली. त्यात एक जण गंभीर जखमी झाला असून अन्य ६ जण जखमी झाले आहेत. वानवडी पोलिसांनी दोन्ही गटातील १७ हून अधिक जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील ९ जणांना अटक केली आहे. ही घटना रामटेकडी येथील कलगीधर गुरुद्वारा येथे बुधवारी दुपारी घडली.
याप्रकरणी कृष्णासिंग कल्याणी (वय ३०, रा. थेऊरगाव, ता. हवेली) यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार हरपालसिंग नेपालसिंग कल्याणी (वय ३०, रा. सोरतापवाडी, कुंजीरवाडी), नेपालसिंग मोहनसिंग कल्याणी (वय ७२), हसपालसिंग नेपालसिंग कल्याणी (वय २८), तपालसिंग नेपालसिंग कल्याणी (वय ४७) आणि जगपालसिंग नेपालसिंग कल्याणी (वय ४२) यांना अटक केली असून अन्य व्यक्तींविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
रामटेकडी येथे कलगीधर गुरूद्वाराचे बांधकाम सुरू असून त्यासंबंधित बुधवारी दुपारी १२ वाजता गुरूद्वारामध्ये बैठक सुरू होती. फिर्यादी, त्यांचा भाऊ, वडील व पुतण्या संबंधित गुरूद्वारा कमिटीचे सदस्य आहेत. त्यांनी गुरूद्वारा केलेल्या बांधकामाचा कमिटीला हिशोब मागितला. त्यावेळी फिर्यादी व आरोपींमध्ये जोरदार वादावादी झाली. त्यानंतर हरपालसिंग कल्याणी याने त्याच्याकडील तलवारीने फिर्यादीचा पुतण्या जसविंदरसिंग गळ्यावर वार करून खुनाचा प्रयत्न केला. तसेच इतर आरोपींनी लाकडी दांडक्याने, लोखंडी सळईने फिर्यादी, त्यांचे वडील, भाऊ व पुतण्याला मारहाण करीत जखमी केले.
याप्रकरणी दुसर्या गटातील नेपालसिंग मोहनसिंग कल्याणी (वय ७०, रा. सोरतापवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. जलसिंग धारासिंग कल्याणी (वय ३८), कृष्णासिंग धारासिंग कल्याणी (वय ३७) व हिम्मतसिंग धारासिंग कल्याणी (वय २९) यांना अटक केली असून इतर ५ ते ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी व त्यांच्या कमिटीचे सदस्य धारासिंगच्या घराच्या बाजुला असलेली गुरूद्वाराची भिंत त्याच्या परवानगीशिवाय बांधण्याबाबत चर्चा करीत होते. त्याचा राग मनात धरून फिर्यादी समवेत असलेले त्यांचे कुटुंबीय जसपालसिंग, हरपालसिंग यांना आरोपींनी शिवीगाळ करीत मारहाण केली. ते पळुन जाताना त्यांच्यावर दगडफेक केली. तर जलसिंग याने गाडीतून तलवार काढून नागरीकांमध्ये दहशत निर्माण केली. दोन्ही गुन्ह्यांमधील सहा ते आठ आरोपी सराईत गुन्हेगार आहेत.