पुरंदर तालुक्यात जागेच्या वादातून दोन गटांत दगडफेक व जाळपोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 09:38 PM2018-07-03T21:38:06+5:302018-07-03T21:39:00+5:30
पोलिसांनी बेकायदेशीर जमाव जमवून दगडफेक व जाळपोळप्रकरणी दोन्ही बाजूंकडील २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील १७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
जेजुरी : पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे येथे जागेच्या वादातून दोन गटांत तुफान दगडफेक व जाळपोळ झाली. यात जीवितहानी झाली नसली तरी दगडफेक व जाळपोळीमुळे सुमारे सात-आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.
जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारगाव मेमाणे चौफुला येथे दत्तात्रय बाबासाहेब मेमाणे यांचे हॉटेल आहे. त्यांनी हॉटेलसमोरील जागेचे सपाटीकरण करण्यास सुरुवात केली होती. हॉटेलसमोरील जागा त्यांच्या मालकीची नसल्याने राजेंद्र पान शॉपचे मालक राजेंद्र साहेबराव मेमाणे यांनी हरकत घेतली होती. त्यांचा हा वाद अनेक महिन्यांपासूनचा आहे. जेजुरी पोलिसांनी यापूर्वीही या दोघांना ताकीद देऊन कायदेशीर मार्गाने जमिनीचा प्रश्न सोडविण्याबाबत सूचना दिली होती. मात्र, काल दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पुन्हा हॉटेलसमोरील जागेचे सपाटीकरण करण्यास सुरुवात केली. याला राजेंद्र मेमाणे यांनी पुन्हा हरकत घेतली. यावरून वादाला तोंड फुटले. दत्तात्रय मेमाणे यांनी त्यांचे बाहेरून नातेवाईक बोलावून राजेंद्र मेमाणे यांच्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यामुळे रात्री ९ वाजण्याच्या सुमारास राजेंद्र मेमाणे यांनी ही ग्रामस्थांना व भावकीतील लोकांना बोलावले. वातावरण आणखीच तापल्याने त्यांनी एकमेकांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. जाळपोळ करण्यासही सुरुवात झाली. यात सावली हॉटेलची तोडफोड करण्यात आली. हॉटेलच्या इमारतीतील किराणा दुकान आणि एक दुचाकी पेटवून देण्यात आली. दुकानातील माल व दुचाकी संपूर्ण जाळून खाक झाले. तसेच तीन दुचाकी, एक अल्टो कार व जेसीबीचे दगडफेकीमुळे तोडफोड झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
दत्तात्रय बाबासाहेब मेमाणे आणि राजेंद्र साहेबराव मेमाणे यांनी एकमेकांविरुद्ध जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिल्या आहेत. जेजुरी पोलिसांनी दोन्ही गटांतील २५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यात कोणीही जखमी नाही. मात्र मालमत्ता व गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मेमाणे यांच्या फिर्यादीनुसार दत्तात्रय बाबासाहेब मेमाणे, श्रीकांत बापूसाहेब मेमाणे, गणेश किसन मेमाणे (तिघेही रा. पारगाव मेमाणे, ता. पुरंदर), मंगेश ऊर्फ मोन्या अशोक कानकाटे, कृष्णा यशवंत खेडेकर (दोघेही रा. उरुळीकांचन, ता. हवेली), योगेश ऊर्फ सोन्या शामराव कुंजीर (रा. भेकराईनगर, हडपसर), केतन विष्णू मोकाशी (रा. भिवडी, ता. पुरंदर) यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे, तर दत्तात्रय मेमाणे यांनीही राजेंद्र साहेबराव मेमाणे, सुभाष गोविंद मेमाणे, गणेश रघुनाथ मेमाणे आदीं व्यक्तींविरोधात(सर्वजण रा. पारगाव मेमाणे, ता. पुरंदर) यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी बेकायदेशीर जमाव जमवून दगडफेक व जाळपोळप्रकरणी दोन्ही बाजूंकडील २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील १७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या १७ आरोपींना आज सासवड न्यायालयात हजर केले असता आरोपींना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश मालेगावे पाटील अधिक तपास करत आहेत.