बारामती शहरात बंद दरम्यान दोन गटात तुफान दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 06:08 PM2018-07-24T18:08:02+5:302018-07-24T18:19:06+5:30
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असताना औरंगाबाद येथील काकासाहेब शिंंदे या युवकाच्या मृत्युनंतर मराठा संघटनांनी बंदची हाक दिली. त्यानुसार बारामती शहरात बंद पाळण्यात आला.
बारामती : बारामती शहरात बंद दरम्यान दोन गटात वाद झाल्याने एसटी बसस्थानक परिसरात तुफान दगडफेक झाली. या दगडफेकीमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. एसटी बसस्थानकात अडकलेल्या विद्यार्थी, महिलांना पोलीस बंदोबस्तामध्ये सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. येथील एसटी वाहतुक बंद करण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्तामुळे शहराला छावणीचे स्वरुप आले आहे.सोमवार (दि. २३) बारामती शहरात संभाजी ब्रिगेड व सकल मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असताना औरंगाबाद येथील काकासाहेब शिंंदे या युवकाच्या मृत्युनंतर मराठा संघटनांनी बंदची हाक दिली. त्यानुसार बारामती शहरात बंद पाळण्यात आला. प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, प्रशासकीय भवन येथील अभियांत्रिकी भवनवर दगडफेक करण्यात आली. येथील रस्त्यावर टायर पेटवुन वाहतूक अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. एसटी वाहतुक बंद करण्यात आल्याने बसस्थानकात शुकशुकाट निर्माण झाला आहे.शहरातील काही व्यावसायिक संकुलाच्या काचा दगडफेक करुन फोडण्यात आल्या आहेत.त्यानंतर बसस्थाकासमोरील हातगाडा बंद करण्याच्या कारणावरून दोन गटात तुफान दगडफेक झाली.त्यामुळे नागरिक, प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. शहरात निर्माण झालेल्या तणावग्रस्त स्थितीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात रिक्षा,ध्वनीक्षेपकाद्वारे जाळपोळ, हिंसा न करण्याचे आवाहन करण्यात आले.
———————————————