पुण्यासाठी दोन ‘हमसफर’रेल्वे गाड्यांना मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 07:44 PM2018-10-04T19:44:48+5:302018-10-04T19:51:54+5:30
रेल्वे मंत्रालयाने पुण्यातून दोन हमसफर गाड्या सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. पुणे ते हबीबगंज आणि पुणे ते संत्रागाची यादरम्यान गाड्या धावतील.
पुणे : रेल्वे मंत्रालयाने पुण्यातून दोन हमसफर गाड्या सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. पुणे ते हबीबगंज आणि पुणे ते संत्रागाची यादरम्यान गाड्या धावतील. दोन्ही गाड्या साप्ताहिक असून अनुक्रमे दर रविवारी व सोमवारी पुणे स्थानकातून सुटतील.
पुणे ते हबीबगंज (२२१७२) ही गाडी दर रविवारी दुपारी ३.१५ वाजता पुणे रेल्वे स्थानकातून सुटेल. दुसऱ्या दिवशी पहाटे ४.४५ वाजता ही गाडी हबीबगंज स्थानकात पोहचेल. तर हबीबगंज स्थानकातून दर शनिवारी सायंकाळी ५.२५ वातजा सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ९.२० वाजता पुणे स्थानकात दाखल होईल. गाडीला केवळ ३ वातानुकूलित डबे असतील. दौंड,अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, इटारसी, होशंगाबाद याठिकाणी गाडीला थांबे देण्यात आले आहेत. ही गाडी दि. ७ आॅक्टोबरपासून धावणार आहे. पुणे - संत्रागाची (२०८२१) ही गाडी दि. ८ आॅक्टोबर पासून पुण्यातून धावणार आहे. दर सोमवारी सकाळी १०.३० वाजता पुण्यातून सुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.१५ वाजता संत्रागाची येथे पोहचेल. या गाडीला पनवेल, कल्याण, भुसावळ, नागपुर, गोंदिया, दुर्ग, रायपुर, बिलासपुर, रुरकेला, चक्रधरपुर, टाटानगर, खरगपुर हे थांबे असतील.