इंदापूरच्या दोन भावांनी कॉर्पोरेट नोकरी सोडून उभारली १३ कोटींची ‘कॉर्पोरेट शेती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:08 AM2021-06-11T04:08:26+5:302021-06-11T04:08:26+5:30
निनाद देशमुख पुणे : शेतीचा गंध नसतानाही दोन भाऊ विषमुक्त शेतीत उतरतात. अल्पावधीत ‘टू ब्रदर ऑरगॅनिक फार्म’ हा ब्रँड ...
निनाद देशमुख
पुणे : शेतीचा गंध नसतानाही दोन भाऊ विषमुक्त शेतीत उतरतात. अल्पावधीत ‘टू ब्रदर ऑरगॅनिक फार्म’ हा ब्रँड तयार करून तो आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवतात. यातून अवघ्या दहा वर्षांत हा ‘ब्रँड’ या दोन भावांनी जवळपास ४५ देशांतील ६६० शहरांत पोहचला आहे. उलाढाल नेली तेरा कोटी रुपयांवर. स्वप्नवत वाटणारी ही यशोगाथा आहे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भोडणी गावच्या सत्यजित आणि अजिंक्य हांगे या दोन भावांची. सुमारे नऊ हजार शेतकऱ्यांना त्यांनी आपल्यासोबत जोडून घेतले आहे.
शेतीमध्ये फायदा नसल्याने मुलांनी चांगले शिकून मोठे व्हावे, यासाठी वडिलांनी लहानपणापासून या दोन्ही भावांना बोर्डिंग स्कूलमध्ये घातले. चांगले शिकून दोन्ही भावांनी बहुराष्ट्रीय बँकेत, कॉर्पोेरेट क्षेत्रात नोकरीही मिळवली. पण लहानपणापासूनची शेतीची आवड त्यांना शांत बसू देत नव्हती. अखेर गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून त्यांनी पुन्हा गावाची वाट धरली आणि सेंद्रिय शेतीची कास धरली.
शेतीत फायदा नसल्याने मुलांना शेती करावी लागू नये अशी त्यांच्या वडिलांची अपेक्षा होती. त्यामुळे सत्यजितने फर्ग्युसन महाविद्यालयातून अर्थशास्त्राची पदवी घेतली. त्यानंतर पुणे विद्यापीठाच्या ‘पुंबा’तून एमबीए पूर्ण केले. अजिंक्यनेही कॉमर्सचे शिक्षण घेतले. दोघांनी वेगवेगळ्या बहुराष्ट्रीय बँकांमध्ये अनुक्रमे १० आणि ४ वर्षे नोकरी केली. शेवटी २०११ मध्ये हांगे बंधूंनी नोकरी सोडून शेतीत उतरण्याचा निर्णय घेतला आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमधून त्यांनी यश मिळवले.
आपले ज्ञान त्यांनी स्वत:पुरते मर्यादित ठेवले नाही. सेंद्रिय शेतीचा प्रसार करण्यासाठी ‘ऑरगॅनिक वूई’ ही सामाजिक संस्था त्यांनी तयार केली. या माध्यमातून सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी शेतकऱ्यांसाठी ते स्वत:च्या शेतावर पंधरा दिवसांचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण घेतात. शहरी, महाविद्यालयीन विद्यार्थी, सोसायट्यांना येथे सेंद्रिय शेती व उत्पादनांचे महत्त्व पटवून दिले जाते. आजवर जवळपास ९ हजार शेतकऱ्यांना त्यांनी प्रशिक्षित केले आहे. या शेतकऱ्यांच्या मालाची विक्रीही हांगे बंधू त्यांच्या ब्रँडखाली करतात.
चौकट
कोरोनाकळात वाढली मागणी
“शेतीला आधुनिकतेची जोड दिल्याने आमचा ब्रँड आंतरराष्ट्रीय झाला. वार्षिक उलाढाल सुमारे १४ कोटींवर गेली आहे. कोरोनाकाळात आम्हाला चांगला फायदा झाला. कारण चांगल्या दर्जेदार अन्नाची मागणी वाढली आहे. इच्छा आणि जिद्द असेल तर काहीही साध्य करता येते हे आम्ही ‘टू ब्रदर ऑरगॅनिक फार्म’च्या माध्यमातून सिद्ध केले.”
-सत्यजित हांगे
चौकट
अशी झाली सुरुवात...
वडिलोपार्जित ३२ एकर शेतीपैकी २१ एकर शेतीत सत्यजित व अजिंक्य यांनी सेंद्रिय शेती सुरू केली. शेतीची माहिती नव्हती. शिक्षणही नव्हते. त्यामुळे वाचन, अभ्यासातून, देश-विदेशाच्या तज्ज्ञांच्या, शेतकऱ्यांच्या भेटीगाठीतून त्यांनी शेतीत प्रयोग चालू केले. सुरुवातीला पपईचे उत्पादन घेतले. विक्रीसाठी पपई गुलटेकडी मार्केट यार्डात आणली; पण माल चांगला असूनही केवळ ४ रुपये किलो भाव मिळाला. दलाल, आडत्यांमुळे दर कधी मिळणार नाही हे हांगे बंधूंना कळून चुकले. त्यामुळे मध्यस्थ टाळून आपणच थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावे असे त्यांनी ठरवले. सुरुवातीला त्यांनी चार देशी गाई घेतल्या. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी सूक्ष्मजीव महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळे त्यांनी शेणखत आणि अन्य सेंद्रिय खते शेतीला दिली. उत्पन्न वाढल्यानंतर आता त्यांच्याकडे सुमारे ८० गायी आहेत. त्यातून त्यांना सेंद्रिय खत मिळते. दुधापासून तयार होणाऱ्या देशी तुपाचाही ब्रँड त्यांनी केला आहे. त्याला चांगली मागणी आहे.
चौकट
हातगाडी विक्रेत्यांपासून मॉलपर्यंत
सुरुवातीला हांगे बंधूंनी हातगाडे विक्रेत्यांना गाठले. यातून नफ्याचे प्रमाण वाढले. पुढे सेंद्रिय शेतीचे प्रमाणपत्र मिळवून पुण्यातील मॉलमध्ये शेतमाल विक्री चालू केली. येथेही नफेखोरी होत असल्याने थेट ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी स्वत:ची वितरण व्यवस्था निर्माण केली. आज राज्यातूनच नव्हे तर देश-विदेशातून त्यांच्या मालाला मागणी आहे.
चौकट
काय पिकते?
उसाचे क्षेत्र कमी करत डाळिंब, देशी पपई, लिंबू, केळी या फळबागांसोबतच देशी तूर, शेवगा, खपली गहू, हरभरा, मूग, उडीद, चवळी ही हंगामी आंतरपिके हांगे बंधू घेतात. शेतीमध्ये विनामशागत तंत्र, मिश्र शेती व ‘फूड फॉरेस्ट’ या संकल्पना ते राबवतात. ‘सोशल मीडिया’चा योग्य वापर करत ते शेतीत प्रयोग करतात. याच प्रयोगांमधून ‘टू ब्रदर ऑरगॅनिक फार्म’चा विस्तार झाला आहे. पुण्याबरोबरच बेंगळुरू, गोवा, मुंबई, दिल्लीतल्या सेंद्रिय उत्पादनांच्या दुकानांमध्ये त्यांची उत्पादने विकली जातात.
चौकट
ऑनलाइन मार्केटिंगचा जमाना
सेंद्रिय उत्पादनांना जगात मागणी आहे, हे हेरून तो माल आंतराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी ‘टू ब्रदर’चे ब्रँडीग त्यांनी केले. फेसबुक, यू-ट्यूब, इन्स्टाग्रामचा वापर केला. स्वत:चे संकेतस्थळ तयार करून फ्लिपकार्ट, अॅमेझॉनसारखी स्वत:ची वितरण व्यवस्था निर्माण केली. या जोरावर ते आता ४५ देशांतील ६६० शहरांत त्यांचा माल पोहोचवतात.