गॅस सिलेंडरमधून गळती होऊन लागलेल्या आगीत मायलेक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 10:25 IST2019-04-30T10:22:15+5:302019-04-30T10:25:24+5:30
गुरुवार पेठेतील शितळादेवी चौक येथील एका इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर गॅस सिलेंडरमधून गळती होऊन लागलेल्या आगीत मायलेक भाजल्याची घटना घडली.

गॅस सिलेंडरमधून गळती होऊन लागलेल्या आगीत मायलेक जखमी
पुणे - गुरुवार पेठेतील शितळादेवी चौक येथील एका इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर गॅस सिलेंडरमधून गळती होऊन लागलेल्या आगीत मायलेक भाजल्याची घटना घडली. मंगळवारी (30 एप्रिल) सकाळी 8 वाजता ही घटना घडली. अनुपमा किशोर जोशी (55) आणि हेमांशु किशोर जोशी (30) अशी भाजलेल्या दोघांची नावे आहेत.
शितळादेवी चौकातील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जोशी यांचे घर आहे. आज सकाळी ते किचनमध्ये स्वयंपाक करत होते. त्यांचा लावलेला सिलेंडर संपायला आल्याने हेमांशु हे दुसरा सिलेंडर लावण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांनी दुसऱ्या सिलेंडरची कॅप काढल्याबरोबर हा दुसरा सिलेंडर पेटला. त्यांनी ताबडतोब हा सिलेंडर किचनमधून हॉलमध्ये ढकलला. त्यात दोघांच्या हाताला व चेहऱ्याला भाजले आहे. किचन व हॉल मधील काही वस्तू या आगीत जळाल्या. अग्निशामक दलाला याची माहिती मिळताच त्यांनी घरात प्रवेश करुन सिलेंडरची आग विझवून दोन्ही जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. दोघांची प्रकृती गंभीर नसल्याचे सांगण्यात येत आहे.