Pune | जीवे मारण्याची धमकी देऊन हॉटेल व्यावसायिकाला खंडणी मागणारे दोघे जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 09:50 AM2023-01-30T09:50:08+5:302023-01-30T09:55:02+5:30
दोघांना उत्तमनगर पोलिसांनी अटक केली...
पुणे : हॉटेलसमोरील ताडपत्रा शेडवर कारवाई करण्याची व जीवे मारण्याची धमकी देऊन २ लाखांची खंडणी मागण्याचा व तडजोडी अंती १ लाख रुपयांची खंडणी घेण्यासाठी आलेल्या दोघांना उत्तमनगर पोलिसांनी अटक केली.
सुभाष अशोक सहजराव (वय ३५, रा. कुडजे) आणि बाळासाहेब हरिभाऊ लोणारे (वय ५८, रा. वारजे माळवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सुकेश शेखर शेट्टी (वय २९, रा. वारजे माळवाडी) यांनी उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अधिक माहितीनुसार, सुकेश शेट्टी यांचे माळवाडी येथे क्राऊड नाईन हॉटेल आहे. त्यांनी हॉटेलच्या समोर ताडपत्रीचे शेड उभारले आहे. हे शेड बेकायदा असून महापालिकेकडून त्यावर कारवाई करायला लावतो, असे सांगून सुभाष सहजराव व बाळासाहेब लोणारे यांनी त्यांच्याकडे २ लाख रुपयांची मागणी केली. सुरुवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पैसे दिले नाही तर जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी यांनी खंडणी विरोधी पथकाचे तक्रार केली.
पोलिसांनी सांगितल्यानुसार त्यांनी पैसे देण्याची तयारी दर्शविली. तडजोडअंती १ लाख रुपये घेण्यास तयार झाले. पोलिसांनी त्यांना खेळण्यातील एक लाख रुपयांच्या नोटांचे बंडल तयार करुन दिले. शिवणे येथील दुधाने इंडियन ऑईल पेट्रोल पंप येथे शनिवारी सायंकाळी सात वाजता ते नोटांचे बंडल घेऊन उभे होते. त्यांच्याकडून पैसे घेण्यासाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी सापळा रचून पकडले.
पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक निरीक्षक चांगदेव सजगणे, उपनिरीक्षक मोहनदास जाधव, श्रीकांत चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.