विजापूरला अपघात, दोघा कबड्डीपटूंचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 08:48 AM2021-03-18T08:48:32+5:302021-03-18T08:49:13+5:30
मंगळवारी रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी कळंब येथील संघातील १३ कबड्डीपटू एका स्पर्धेसाठी विजापूरच्या दिशेने निघाले होते. महादेव आवटे, सोहेल सय्यद, समीर शेख, अनिकेत सूर्यवंशी, संदीप सूर्यवंशी, गणेश कोळी, आविष्कार कोळी, सिद्धार्थ कांबळे आदींचा यामध्ये समावेश होता.
वालचंदनगर (जि. पुणे) : कळंब येथील महाराणा कबड्डी संघातील खेळाडूंच्या तवेरा गाडीला विजापूर येथे बुधवारी पहाटे ५ च्या सुमारास अपघात झाला. रनिहला क्रॉसजवळ (ता. कोल्हारा) समोरून आलेल्या कंटेनरची व तवेराची टक्कर झाली. या गंभीर अपघातात महादेव आवटे व सोहेल सय्यद या कबड्डीपटूंचा मृत्यू झाला आहे, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
मंगळवारी रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी कळंब येथील संघातील १३ कबड्डीपटू एका स्पर्धेसाठी विजापूरच्या दिशेने निघाले होते. महादेव आवटे, सोहेल सय्यद, समीर शेख, अनिकेत सूर्यवंशी, संदीप सूर्यवंशी, गणेश कोळी, आविष्कार कोळी, सिद्धार्थ कांबळे आदींचा यामध्ये समावेश होता. पहाटे पाचच्या सुमारास त्यांची गाडी व कंटेनरची टक्कर झाल्याने गाडीमधील समोर बसलेले महादेव आवटे व सोहेल सय्यद यांचा जागीच मृत्यू झाला, तर वाहनचालक वैभव मोहिते व गणेश कोळी यांना गंभीर दुखापत झाली आहे.
सर्व जखमींना विजापूर येथील बंजारा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कबड्डीच्या माध्यमातून या खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर गावाचा नावलौकिक वाढवला आहे. कळंबमधून तातडीने ग्रामस्थ विजापूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. कोल्हारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील महाराणा कबड्डी संघ राज्यात प्रसिद्ध आहे. येथे कबड्डीसाठी अनेक विद्यार्थी येतात. या संघातून अनेक राष्ट्रीय कबड्डीपटू घडले आहेत.