वारकऱ्यांच्या दिंडीला भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, 20 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 10:18 AM2021-11-27T10:18:38+5:302021-11-27T10:23:02+5:30
पायी जाणाऱ्या दिंडीत पिकअप घुसल्याने दोन वारकऱ्यांना गंभीर जखम झाली होती. उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला.
पुणे - कार्तिकी एकादशीला आळंदीकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पिक अप गाडी शिरल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून 20 वारकरी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कान्हे फाटा येथे हा अपघात झाला आहे. अपघातातील जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनीही यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली.
पायी जाणाऱ्या दिंडीत पिकअप घुसल्याने दोन वारकऱ्यांना गंभीर जखम झाली होती. उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. सविता वाळकू येरभ (वय 58), रा. उंबरे, खालापूर, रायगड आणि जयश्री आत्माराम पवार (वय 54), रा.भूतवली, ता. कर्जत, जि रायगड, अशी मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांची नावे आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वडगाव-मावळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पिक अप चालकाला ताब्यात घेतले आहे. खालापूर येथून ही दिंडी आळंदीकडे जात असताना सकाळी हा अपघात झाला. सध्या कामशेतच्या महावीर हॉस्पिटलमध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत.
आळंदीकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीला कामशेत(साते)गावाजवळ वाहनाची जोरदार धडक बसून,या दुःखद घटनेत १८ वारकऱ्यांना गंभीर इजा झाली आहेत. जखमी वारकऱ्यांची प्रकृती लवकर बरी होवो ही प्रार्थना.आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करू. नजीकच्या रुग्णालयात त्वरित उपचार सुरू करण्यात आले आहेत
— Parth Pawar (@parthajitpawar) November 27, 2021
पार्थ पवार यांनीही ट्विट करुन आमच्याकडून मतदकार्य सुरू असल्याचं सांगितलंय. तसेच, जखमी वारकरी लवकर बरे होवोत, अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे.