लोणावळ्यात पिकअप जीपला भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यूतर २५ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 12:05 AM2021-11-24T00:05:28+5:302021-11-24T00:05:47+5:30
Accident News: अहमदनगर येथून खोपोली येथील गगनगिरी महाराज मठ येथे देव दर्शनासाठी भाविकांना घेऊन जाणाऱ्या पिकअप जीपच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू तर २५ जण गंभीर जखमी झाले आहेत.
लोणावळा : अहमदनगर येथून खोपोली येथील गगनगिरी महाराज मठ येथे देव दर्शनासाठी भाविकांना घेऊन जाणाऱ्या पिकअप जीपच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात दोन ठार तर २५ जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये पुरुष, महिला व लहान मुलांचा समावेश आहे. हा अपघात मंगळवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्यातील वलवण पुलाजवळ झाला आहे.
पिकअप वाहन चालक संदिप ज्ञानेदव भालके (वय-41, रा. कोठे बुद्रुक, सगमंनेर,अहमदनगर) व दिपक सुभाष कडाळे (वय-18, रा.पिंपळदरी, अकोले, अहमदनगर) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर जखमींमध्ये अक्षय पंढरी कडाळे, अजय भाऊसाहेब कडाळे, राकेश कडाळे, निलेश कडाळे, विजय शिवाजी मेंगाळ, रेवन कडाळे, अवदुत मधे, अर्जुन कडाळे, करण कडाळे, संतोष पारधी, विलास कडाळे, प्रविण दिंगबर भगत, विजय ज्ञानदेव कडाळे, ओंमकार प्रकाष कडाळे, लक्ष्मी कुंडलीक कडाळे, रेश्मा पारधी, काजल कडाळे (सर्व रा.पिंपळदरी ता. अकोले जि.अहमदनगर), अमोल सावळेराम दुधवडे (रा. करजुले पठार,संगमनेर, अहमदनगर) करण सुदाम उघडे (वय-19, व रा.गुंजाळवाडी, संगमनेर, अहमदनगर) तसेच इतर पाच महीला व पाच लहान मुले (पुर्ण नाव माहीत नाही) यांचा समावेश आहे.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर मधील पिंपळदरी व परिसरातील भाविक हे अहमदनगर येथून खोपोली येथील गगनगिरी महाराज मठ येथे देवदर्शनासाठी पिकअप वाहनाने (क्रमांक- एमएच-14/जीयु-9227) जात होते. मंगळवारी पहाटे अडीच सुमारास भरधाव वेगात वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पिकअप गाडी लोणावळ्यातील वलवण गावच्या हद्दीत जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या पुलाच्या सिमेंटच्या कठड्यावर जोरात धडकली.
या भीषण घडकेत वाहन चालकासह एकाचा जागीच मृत्यू झाला असून, सुमारे 25 भाविक जखमी झाले आहेत. यामध्ये 15 जण गंभीर तर 10 जण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलीस व मार्गावरील देवदूत आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेत अपघातातील जखमींना उपचारासाठी तत्काळ नजिकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तर काही गंभीर जखमींना सोमाटणे येथील पवना हॉस्पिटल व काहींना पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्या ठिकाणी जखमींवर उपचार सुरू आहेत. या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहरचे सहायक पोलीस निरीक्षक संदेश बावकर हे करीत आहे.