Heavy Rain: अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यात दोन बळी, २५१ हेक्टरवरील शेतीचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 10:22 PM2022-10-18T22:22:18+5:302022-10-18T22:22:18+5:30
परिस्थितीचा आढावा घेऊन तत्काळ पंचनामे करण्याचे व तसा अहवाल सादर करण्याचे आदेश...
पुणे : जिल्ह्यात अनेक मंडळात साेमवारी रात्री अतिवृष्टी झाली असून, दोघांचा मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. या पावसाने शेतीपिकांसह सार्वजनिक व खासगी मालमत्तांचेही नुकसान झाले आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन तत्काळ पंचनामे करण्याचे व तसा अहवाल सादर करण्याचे आदेश देशमुख यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील शंभर मंडळांपैकी २४ मंडळांत ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची नाेंद करण्यात आली आहे.
पुरंदर तालुक्यातील पांडेश्वर गावातील अजय शिंदे (वय ४०) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर भाेरजवळील धनंजय शिरवले (वय २४) हा तरुण नीरा नदीच्या पुलाजवळ मृतावस्थेत आढळला. या अतिवृष्टीमुळे ११८ कुटुंबांना सुरक्षित जागी स्थलांतरित केले आहे. तसेच १६१ पशुधनही स्थलांतरित केले आहेत. या पावसात १९ जनावरांचा व ४० काेंबड्यांचा मृत्यू झाला आहे. ८५ घरांची काही प्रमाणात, तर एका घराची पूर्णपणे पडझड झाली आहे. २५१ हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले.
जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी व्हीसीद्वारे आढावा बैठक घेऊन जिल्हयातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांंना आदेश दिले. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत १२३ टक्के पाऊस झाला आहे. साेमवारी रात्री पावणेदहा ते एक वाजेपर्यंत माेठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीने पुणे शहरात ४२ ठिकाणी पाणी तुंबल्याचीही माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.