मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघातात दोन ठार; तिघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 02:42 AM2019-12-31T02:42:36+5:302019-12-31T02:42:40+5:30
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कार अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी मध्यरात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास घडला.
खोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कार अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी मध्यरात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास घडला.
मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर किलोमीट ३८ च्या दरम्यान मुंबईच्या दिशेने जाणारी कार सुरक्षेसाठी लावलेल्या क्रॅश बॅरियरमध्ये डाव्या बाजूने घुसली. यात क्रॅश बॅरियर डाव्या बाजूची हेड लाईट फोडून आत घुसला. समोर बसलेले मोतीराम मोतीवाले (७०) यांच्या शरीरात तो घुसला. तर त्यांच्या मांडीवर बसलेल्या शान (२) जखमी झाला. मागे बसलेली त्यांची सून मोहिनी(३०) व त्यांची नात खुशी (१५) जखमी झाल्या तर मागच्या सीटवर बसलेल्या उषा (६५) यांच्या पोटात शिरला. या अपघातात मोतीराम मोतीवाले आणि उषा मोतीवाले यांचा जागीच मृत्यू झाला.
नातू शान, सून मोहिनी आणि नात खुशी यांना उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातात सहप्रवासी किरण जीवन गुरसुंड या आश्चर्यकारकरित्या बचावल्या असून चालक देखील सुखरूप आहे.
अपघात घडताच देवदूत यंत्रणा घटनास्थळी पोहचली आणि बचाव कार्य सुरु केले होते. रोडवेज पेट्रोलिंग, बोरघाट पोलीस टीम, डेल्टा फोर्स, लोकमान्य आरोग्य यंत्रणा यांनी तातडीने हालचाल करून जखमींना रूग्णालयात पाठवले. या बाबत पुढील तपास खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरंग किसवे करीत आहेत.