मिरवणुकीत झेंडा फडकावताना विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू ;मंडळ अध्यक्षासह चौघांवर गुन्हा

By नितीश गोवंडे | Published: September 23, 2024 06:18 PM2024-09-23T18:18:33+5:302024-09-23T18:18:46+5:30

र्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी मंडळाच्या अध्यक्षांसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला

Two killed due to electric shock while hoisting flag in procession | मिरवणुकीत झेंडा फडकावताना विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू ;मंडळ अध्यक्षासह चौघांवर गुन्हा

मिरवणुकीत झेंडा फडकावताना विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू ;मंडळ अध्यक्षासह चौघांवर गुन्हा

पुणे : मोहंमद पैगंबर जयंतीनिमित्ताने काढलेल्या मिरवणुकीत झेंडा फडकावताना दोन तरुणांना उच्च दाबाच्या वीज वाहिनीचा धक्का बसल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी वडगाव शेरीतील भाजी मंडई परिसरात घडली. या दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी मंडळाच्या अध्यक्षांसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी वडगाव शेरीतील मिम बाॅईज फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष हुसेन कादर शेख (३५, रा. वडगाव शेरी), विकास अच्युत कांबळे (३२), अक्षय बापू लावंड (२८) आणि संतोष धावजी दाते (३६, रा. राजगुरूनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभय अमाेल वाघमारे (१७) आणि जक्रीया बिलाल शेख (२०, दोघे रा. वडगाव शेरी) अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. याबाबत पोलिस हवालदार पंकज मुसळे यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वडगाव शेरी परिसरात रविवारी (दि. २२) मोहंमद पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी साडेदहाच्या सुमारास वडगाव शेरी भाजी मंडई परिसरात मिरवणूक आली. त्यावेळी अभय वाघमारे आणि काही तरुण झेंडा फडकावत होते. झेंडा लोखंडी गजाला लावण्यात आला होता. झेंडा फडकावत असताना झेंड्याचा धक्का उच्च क्षमतेच्या वीज वाहिनीला लागला. झेंडा लोखंडी गजाला लागलेला असल्याने गजात विद्युतप्रवाह उतरला आणि विजेच्या धक्क्याने अभय खाली कोसळला. शेख यालाही विजेचा धक्का बसला. दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला.

सहायक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. चौकशीत मंडळाचे अध्यक्ष शेख यांनी पोलिसांनी दिलेल्या अटी आणि शर्तींचे पालन केले नसल्याचे निदर्शनास आले, तसेच कांबळे याने ट्रॅक्टरवर लाकडी फळ्या टाकून स्टेज बांधला. लावंड आणि दाते यांनी डीजे आणि एलईडी स्क्रीन ट्रॅक्टरवर बसवली. त्यामुळे देखाव्याची उंची मर्यादेपेक्षा जास्त झाल्याने दुर्घटना घडली, असे पाेलिस हवालदार मुसळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Two killed due to electric shock while hoisting flag in procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.