पुणे शहरातील अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू तर सहा वर्षाच्या मुलासह पाच व्यक्ती जखमी
By नम्रता फडणीस | Published: May 2, 2024 03:55 PM2024-05-02T15:55:08+5:302024-05-02T15:56:41+5:30
कोंढव्यातील ज्योती हाॅटेल चौक परिसरात भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली...
पुणे : शहरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे तसेच सहा वर्षाच्या मुलासह पाच व्यक्ती जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मार्केटयार्ड, कोंढवा, लोणीकंद तसेच पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर परिसरात अपघाताच्या घटना घडल्या.
कोंढव्यातील ज्योती हाॅटेल चौक परिसरात भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सुनील परशुराम परसैया (वय ४९, रा. मारुती आळी, कोंढवा) असे मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत परसैया यांच्या पत्नीने (वय ४१) कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार सुनील परसैया मंगळवारी (३० एप्रिल) सकाळी पावणेबाराच्या सुमारास निघाले होते. त्यावेळी कोंढव्यातील ज्योती हाॅटेल चौकाजवळ भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिली. यात सुनील परसैया गंभीर जखमी झाले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या डंपरचालकाचा शोध घेण्यात येत असून, पोलीस कर्मचारी रासकर तपास करत आहेत.
पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर परिसरात ट्रकच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाला. तानाजी किसन पवार (वय ३६, रा. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याबाबत पवार यांचे भाऊ संभाजी (वय ३८) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रविवारी (२८ एप्रिल) मध्यरात्री दोनच्या सुमारास तानाजी पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी स्टेशन चौकातून निघाले होते. त्यावेळी भरधाव ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या तानाजी यांना धडक दिली. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे तपास करत आहेत.
याशिवाय मार्केटयार्ड आणि येवलेवाडी परिसरात विविध ठिकाणी झालेल्या अपघातात सहा वर्षांच्या मुलासह चार व्यक्ती जखमी होण्याच्या घटना घडल्या. मार्केटयार्ड आईमाता रस्त्यावर झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले. केवल प्रकाश खनावेलकर, अनिरुद्ध रामचंद्र करंदीकर, महेशकुमार व श्रावणकुमार अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. केवल प्रकाश खनावेलकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ज्योतीराम अजिनाथ कुंभार (वय २५ रा. नऱ्हे गाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अनिरुद्ध हे त्यांच्या मित्रासमवेत एका ग्राहकाला आंब्याची पेटी देण्यास चालले होते. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अत्यंत बेदारकपणे वाहन चालविल्याने त्याच्या गाडीतील जाड केबलचे बंडल रस्त्यावर पडल्याने ते घरंगळत फिर्यादीच्या गाडीवर येऊन आदळल्याने झालेल्या अपघातात चौघे जण जखमी झाले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक सिसाळ पुढील तपास करीत आहेत.
टिळेकर नगर ते येवलेवाडी परिसरात रस्त्यावर कामगार पती पत्नी फुटपाथाचे काम करीत होते. रस्त्याच्या कडेला त्यांचा सहा वर्षांचा मुलगा थांबला होता. येवलेवाडीच्या दिशेने भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीस्वाराने लहान मुलाला धडक दिल्याने मुलगा बारा फूट लांब उडून रस्त्यावर पडून गंभीर झाला. याप्रकरणी नागेश हेमंत चव्हाण (वय ३५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ओम कैलास लोखंडे (वय १८ कात्रज) या मुलावर कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.