दोन दुचाकींच्या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू, एक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 09:25 IST2023-12-27T09:24:38+5:302023-12-27T09:25:02+5:30
वाघोलीत पुणे-नगर महामार्गावरील घटना

दोन दुचाकींच्या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू, एक जखमी
वाघोली : पुणे-नगर महामार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. त्यामध्ये दोन तरुण ठार झाले, तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे. हा अपघातपुणे-नगर महामार्गावरील अधिरा सोसायटीसमोर सोमवारी रात्री ११ ते १२ च्या दरम्यान घडला आहे. रावसाहेब सिदाजी माने ( वय २१, रा. रामनगर, लोणीकंद) व राहुल मोहन डुकले (वय १९), रा. गोरे वस्ती, वाघोली) असे अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत.
लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावसाहेब हा फूड डिलिव्हरी करण्याचे काम करत होता. तो फूड डिलिव्हरी करण्यासाठी जात असताना राहुल मित्रासोबत दुचाकीवर जात होता. दोघांच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यामध्ये एक जण जागेवरच ठार झाला. तर राहुल रुग्णालयात नेताना मृत्युमुखी पडला. राहुलच्या मागे बसलेला तरुण किरकोळ जखमी झाला. याप्रकरणी लोणीकंद पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. रावसाहेब याच्या मागे आईवडील, विवाहित बहीण असा परिवार आहे. तो मनमिळावू होता. असे लोणीकंद ग्रामपंचायत सदस्य सुधीर कंद यांनी सांगितले. राहुल याच्या मागे आईवडील, बहीण-भाऊ असा परिवार आहे. तो टेम्पो चालविण्याचे काम करत होता. दोघेही अविवाहित होते. याचा पुढील तपास लोणीकंदचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलिस करत आहेत.