शरद पवार यांना पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी बारामतीत दोन किमी रांगा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 05:20 PM2019-10-28T17:20:26+5:302019-10-28T17:29:07+5:30
पाडव्यानिमित्त ‘पवारसाहेबां’ना शुभेच्छा देण्यासाठी राज्यातून गर्दी झाली होती. यावेळी दोन किलोमीटर रांगा लागल्याचे चित्र होते.
बारामती - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार , पवार कुटंबीय त्यांची दिवाळीनिमित्तबारामतीत असतात. यानिमित्त सर्व कुटुंबीय एकत्र येतात. यावेळी ‘पवारसाहेब’ पाडव्यानिमित्त गोविंदबाग या त्यांच्या निवासस्थानी येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला भेटतात. त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करतात. ही परंपरा त्यांनी अनेक वर्षांपासून जपली आहे. सोमवारी पाडव्यानिमित्त ‘पवारसाहेबां’ना शुभेच्छा देण्यासाठी राज्यातून गर्दी झाली होती. यावेळी दोन किलोमीटर रांगा लागल्याचे चित्र होते. शेकडोंच्या संख्येने वाहनांची गर्दी झाली होती.
ज्येष्ठ नेते शरद पवार,माजी उपमुख्यमंंत्री अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे ,नवनिर्वाचित आमदार रोहित पवार सकाळी ७ वाजल्यापासुन शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी उपस्थित होते.यावेळी पार्थ पवार,जय पवार यांची देखील यावेळी उपस्थिती होती.यावेळी पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.त्यासाठी राज्यातील ‘व्हीआयपी’ देखील रांगेत होते. आमदार धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड,दत्तात्रय भरणे,आमदार सुनील टींगरे,सुनील तटकरे,सुनील शेळके आदी बड्या नेत्यांची पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती.
शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातुन आलेल्या वाहनांच्या रांगा लाबल्या होत्या.परीसरातील दोन किलोमीटरचे रस्ते वाहनांच्या ‘पार्किंग’ने फुल झाले होते. शिवाय शुभेच्छा देण्यासाठी देखील अशाच प्रकारच्या रांगा होत्या. कार्यकर्ते केवळ शुभेच्छा देण्यासाठी चार ते पाच तास रांगेत थांबल्याचे चित्र होते. यंदा या गर्दीमध्ये गेल्या काही वर्षांच्या तुलनेने वाढ झाल्याचे चित्र होते. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवार यांची तरुणांमध्ये क्रेझ वाढल्याचे यावेळी दिसुन आले.आज झालेल्या गर्दीमध्ये युवकांची संख्या अधिक असल्याचे दिसुन आले.
...७२ तासानंतर ‘अजितदादा’ ‘रीचेबल’
बारामतीच्या इतिहासात प्रथमच सर्व विरोधी उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्याचा इतिहास घडविणारे अजित पवार गेल्या ७२ तासांपासुन गायब होते.आज ते पाडव्याच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी बारामतीत अवतरल्याचे दिसुन आले.त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार,खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमवेत दिवाळी शुभेच्छांचा स्वीकार केला. दिवाळीत आवर्जुन बारामतीकरांना भेटणारे ‘अजितदादा’ अद्याप ‘नॉट रीचेबल’ होते. आज त्यांना भेटुन बारामतीकरांचा जीव भांड्यात पडला.
‘पवार साहेबां’ना शुभेच्छा देण्यासाठी पुणे—बारामती पायी प्रवास
पाडव्यानिमित्त शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी पुणे शहरातील आंबेगाव येथुन दोन अवलीया सुमारे १०० किलोमीटरचा पायी प्रवास करीत येथे पोहचले. विशाल सोळसकर ,रविंद्र सोळसकर अशी या दोघांची नावे आहेत.यावेळी दोघांनी ८० व्या वर्षी ‘साहेबां’नी तरुणांसमोर आदर्श ठेवला आहे.त्यांनी लोकहिताचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे अशा नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी हा प्रवास पायी केल्याचे ते म्हणाले.