वर्षाच्या पहिल्याच दिवशी मेट्रोत दोन लाख नागरिकांनी केला प्रवास
By अविनाश रावसाहेब ढगे | Updated: January 3, 2025 16:46 IST2025-01-03T16:46:22+5:302025-01-03T16:46:44+5:30
मेट्रोने प्रथमच दोन लाख प्रवाशांचा टप्पा ओलांडला, पिंपरी ते स्वारगेट मार्गानेही ओलांडला एक लाख प्रवाशांचा टप्पा

वर्षाच्या पहिल्याच दिवशी मेट्रोत दोन लाख नागरिकांनी केला प्रवास
पिंपरी :मेट्रोच्या पिंपरी ते स्वारगेट (पर्पल मार्गिका) आणि वनाज ते रामवाडी (ॲक्वा मार्गिका) या दोन्ही मार्गांवर वर्षाच्या पहिल्याच दिवशी बुधवारी (दि. १) २,०४,९५७ प्रवाशांनी प्रवास केला. वनाज ते रामवाडी मार्गिकेवर १,०२,१७४ प्रवाशांनी, तर पिंपरी ते स्वारगेट मार्गिकेवर १,०२,७८३ प्रवाशांनी प्रवास केला असून, प्रथमच वनाज ते रामवाडीपेक्षा पिंपरी ते स्वारगेट या मार्गावर जास्त प्रवाशांनी प्रवास केला.
अनेकजण खरंतर नववर्षाची सुरुवात देवदर्शनाने करतात. पुणे शहरात अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे आहेत. पिंपरी चिंचवड आणि पुणेकरांनीही बुधवारी पुण्यातील दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. तसेच कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून लाखोंचा जनसमुदाय पुण्यात आला होता.
पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील भाविकांनी आणि भीमसैनिकांनी बुधवारी प्रवासासाठी मेट्रोला पसंती दिली आहे. बुधवारी मेट्रोच्या दोन्ही मार्गांवरून २,०४,९५७ प्रवाशांनी प्रवास केला. यात वनाज ते रामवाडी मार्गिकेवर १,०२,१७४ प्रवाशांनी, तर पिंपरी ते स्वारगेट मार्गिकेवर १,०२,७८३ प्रवाशांनी प्रवास केला. पुणे मेट्रोने बुधवारी पहिल्यांदाच दोन लाख प्रवाशांचा टप्पा ओलांडला. तसेच पिंपरी ते स्वारगेट मार्गावरही पहिल्यांदाच एक लाखाहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यामुळे पिंपरी ते स्वारगेट मार्गाला प्रवाशांची पसंती वाढताना दिसून येते.
मेट्रो सर्वाधिक प्रवासी संख्येची नोंद
पिंपरी ते स्वारगेट (१७.५ किलोमीटर, १४ स्थानके) आणि वनाझ ते रामवाडी (१४.५ किलोमीटर, १६ स्थानके) असा दोन्ही मिळून ३३ किलोमीटरचा मेट्रो मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू झाला आहे. मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर आतापर्यंत ३० जून रोजी संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पुण्यात असताना १ लाख ९९ हजार ४३७ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला होता. त्यानंतर बुधवारी (दि. १) सर्वाधिक २ लाख ४ हजार ९५७ प्रवाशांनी प्रवास केला.
प्रवासी संख्या - मार्ग
दिनांक - पिंपरी ते स्वारगेट - वनाज ते रामवाडी - एकूण
३० डिसेंबर - ६४,३९७ - ८२,१४० - १,४६,५३७
३१ डिसेंबर - ६५,५८५ - ८०,३८८ - १,४५,९७३
१ जानेवारी - १,०२,७८३ - १,०२,१७४ - २,०४,९५७