पुण्यात पावणेदोन लाख भटक्या कुत्र्यांना टोचणार लस; ‘रेबीज फ्री पुणे’साठी आरोग्य विभागाची मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 11:26 AM2024-04-03T11:26:24+5:302024-04-03T11:27:15+5:30

रेबीज लसीकरण केल्यामुळे श्वानांमध्ये रेबीजची लागण हाेत नाही, त्यामुळे त्यांच्यापासून माणसांनाही रेबीज हाेत नाही

Two lakh stray dogs will be vaccinated in Pune Health Department campaign for Rabies Free Pune | पुण्यात पावणेदोन लाख भटक्या कुत्र्यांना टोचणार लस; ‘रेबीज फ्री पुणे’साठी आरोग्य विभागाची मोहीम

पुण्यात पावणेदोन लाख भटक्या कुत्र्यांना टोचणार लस; ‘रेबीज फ्री पुणे’साठी आरोग्य विभागाची मोहीम

पुणे: रेबीज हा जीवघेणा आजार आहे. एखाद्या व्यक्तीला एकदा रेबीज झाला की मृत्यू हमखास हाेताे. रेबीज हा प्राण्यांच्या चाव्यापासून माणसाला हाेताे. त्याला प्रतिबंध म्हणून केंद्र शासनाच्या निर्देशानुसार महापालिकेच्या आराेग्य विभागाने ‘रेबीज फ्री पुणे’साठी पावले उचलली असून, येत्या काही दिवसांत शहरातील १ लाख ८० हजार भटक्या कुत्र्यांना रेबीज लसीचा डाेस देण्यात येणार आहे. त्यासाठी पशुवैद्यकीय विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

रेबीज हा व्हायरस असून, ताे प्रामुख्याने प्राण्यांमध्ये, खासकरून श्वानांमध्ये असताे. प्राण्यांच्या चाव्यातून ताे माणसाच्या शरीरात शिरल्यानंतर सेंट्रल नर्व्हस सिस्टिमवर (मज्जासंस्था) हल्ला करतो. मज्जासंस्थेतून ताे मेंदूपर्यंत पाेहोचताे. एकदा ताे मेंदूत पाेहोचला तर त्या रुग्णाचा मृत्यू निश्चित हाेताे. तसेच हा मृत्यू भयानक असताे. म्हणून रेबीज हाेऊच नये यासाठी केंद्र शासनाने पावले उचलली आहेत. संपूर्ण देशातच भटक्या श्वानांचे लसीकरण करण्याची माेहीम आखली आहे. त्यामध्ये पुण्याचाही समावेश आहे.

रेबीज लसीकरण केल्यामुळे श्वानांमध्ये रेबीजची लागण हाेत नाही. त्यामुळे त्यांच्यापासून माणसांनाही रेबीज हाेत नाही. म्हणून हे लसीकरण महत्त्वाचे आणि गरजेचे आहे. पुण्यात भटक्या श्वानांची संख्या प्रचंड आहे. त्यांची उत्पत्ती वाढू नये यासाठी नियुक्त केलेल्या संस्थांकडून या भटक्या नर किंवा मादी कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी करण्यात येते आणि पुन्हा त्यांना ज्या भागातून पकडले हाेते, तेथे साेडण्यात येते. साेबत त्यांना रेबीजचे डाेस देण्यात येताे. परंतु, आता सर्वच श्वानांना पकडून तेथेच लसीकरण केले जाणार असल्याची माहिती पशुवैद्यकीय विभागाच्या प्रमुख डाॅ. सारिका फुंडे यांनी दिली.

पुणे रेबीज फ्री करण्यासाठी हे लसीकरण करण्यात येणार आहे. शहरात कुत्र्यांना पकडण्यासाठी आणि नसबंदीसाठी आराेग्य विभागाने पाच संस्थांची नियुक्ती केली आहे. त्या संस्थांमार्फत कुत्र्यांना पकडून तेथेच रेबीजचा डाेस देण्यात येईल. डाेस दिला यासाठी काहीतरी खूनही करण्यात येईल. या डाेसची मर्यादा वर्षापुरती असून, प्रत्येक वर्षी हे लसीकरण करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत त्यासाठी संस्थेला टेंडर देण्यात येईल. - डाॅ. सारिका फुंडे, पशुवैद्यकीय विभाग प्रमुख, पुणे मनपा

पुणे व राज्यात श्वानांचा चावा अन् रेबीजमुळे झालेला मृत्यू (सन २०२३)

पुणे : चावा - ३३ हजार ११७, मृत्यू - १०

महाराष्ट्र : चावा - ८ लाख ९ हजार, मृत्यू - ३०

Web Title: Two lakh stray dogs will be vaccinated in Pune Health Department campaign for Rabies Free Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.