ऑनलाइन कपडे पडले दोन लाखांना; गुगलवर नंबर शोधला, गंडा बसला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 11:39 AM2024-01-13T11:39:03+5:302024-01-13T11:39:37+5:30
गणेशखिंड रोड परिसरात राहणाऱ्या एका ४७ वर्षीय महिलेने गुरुवारी (दि.१२) याबाबत पोलिसांत फिर्याद दिली...
पुणे : ऑनलाइन कपडे मागविणे एका महिलेला महागात पडल्याचा प्रकार समोर आला आहे. गणेशखिंड रोड परिसरात राहणाऱ्या एका ४७ वर्षीय महिलेने गुरुवारी (दि.१२) याबाबत पोलिसांत फिर्याद दिली.
फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे, ८ ऑक्टोबर २०२३ रोजी महिलेने फ्लिपकार्टवरून ड्रेस मागवला होता; परंतु त्यांनी मागवलेला ड्रेस डिफेक्टिव्ह असल्याने त्यांनी तो परत पाठवण्यासाठी संपर्क केला. ऑनलाइन वेबसाइटवर दिलेल्या कस्टमर केअरच्या क्रमांकावर फोन केला असता समोरच्या व्यक्तीने त्यांना फ्लिपकार्टमधून बोलत असल्याचे सांगितले. तुमचा ड्रेस परत करून त्याचे रिफंड मिळवून देतो, असे महिलेला सांगितले.
महिलेचा विश्वास संपादन करून त्यांच्या बँकेच्या खात्याची माहिती देण्यास भाग पाडले. महिलेच्या बँक खात्यातून २ लाख १८ हजार रुपये परस्पर ट्रान्स्फर करून घेतले. याप्रकरणी महिलेने चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. अनोळखी व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे करत आहेत.