कोंबड्यांवर ताव मारण्यासाठी एकाचवेळी आले दोन बिबटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:14 AM2021-09-04T04:14:08+5:302021-09-04T04:14:08+5:30
याबाबत माहिती अशी की, खोडद येथे निमगावसावा रोडवर पापाभाई तांबोळी यांची पोल्ट्री आहे. सध्या या पोल्ट्रीमध्ये ४ हजार कोंबड्या ...
याबाबत माहिती अशी की, खोडद येथे निमगावसावा रोडवर पापाभाई तांबोळी यांची पोल्ट्री आहे. सध्या या पोल्ट्रीमध्ये ४ हजार कोंबड्या आहेत. तांबोळी हे पोल्ट्रीमध्ये झोपले होते. पोल्ट्रीच्या भिंतीवर हे दोन्ही बिबटे चढल्याने कोंबड्यांनी घाबरून एकच गलका केला. कोंबड्यांच्या आवाजाने पापाभाई तांबोळी व त्यांचा मुलगा मयूर तांबोळी हे जागे झाले. एकाच वेळी दोन बिबटे समोर पाहिल्याने घाबरून जाऊन थोडा वेळ त्यांचा गोंधळ उडाला. हे दोन्ही बिबटे या वेळी पोल्ट्रीच्या जाळीवर पंजे मारून जाळी तोडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, वेळीच प्रसंगावधान राखत पापाभाई व मयूर यांनी आरडाओरडा करून पत्र्याचे डबे वाजवून या दोन्ही बिबट्यांना हाकलून लावळण्यात यश मिळविले. याच दरम्यान मयूर तांबोळी याने आपल्या मोबाईलमध्ये या दोन्ही बिबट्यांच्या हालचाली टिपल्या आहेत.
शेतात जाताना एकट्याने जाऊ नये. हातात काठी ठेवावी. मोबाईलवर गाणी वाजवावीत. लहान मुलांना एकटे सोडून नये. जनावरे बंदिस्त गोठ्यात ठेवावीत. आपले घर शेताजवळ असेल तर घराला लोखंडी जाळीचे कंपाउंड करावे, असे आवाहन ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश घोडके यांनी केले आहे.
एकाच वेळी दोन बिबटे पाहायला मिळाल्याने खोडद परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात असलेले हे बिबटे भक्ष्य व पाण्यासाठी रोज पाच ते दहा किलोमीटर परिसरात वावरतात. या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
जुन्नर तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून बिबट्यांचा वावर आहे. जुन्नर तालुक्यात बिबट्या नागरिकांसोबत सहजीवन जगत असल्याचे पाहायला मिळत आहे. अलीकडच्या काळात शेतकरी व बिबट्या यांची एकमेकांना आता सवय झाल्यासारखे वाटत आहे. शेतकरी शेतात सायंकाळी, रात्री अपरात्री, पहाटेच्या सुमारास केव्हाही शेतीची कामे करण्यासाठी जाताना बिबट्या शेतकऱ्यांना दिसणे हे आता अंगवळणी पडले आहे. शेतात काम करण्यासाठी जाताना शेतकरी विशेष काळजी घेत असल्याने तसेच शेतकरी बिबट्या दिसल्यानंतर त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास न देता आपले काम करत राहतात. काही वेळानंतर बिबट्या त्या ठिकाणाहून निघून जातो. उसाच्या शेतात बिबट्या दिसणे, रस्ता ओलांडून जाताना दिसणे, पाणी पिताना दिसणे, हे आता शेतकऱ्यांसाठी नित्याचे झाले आहे.
जुन्नर तालुक्यात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. ऊसशेती ही बिबट्यासाठी अत्यंत सुरक्षित अशी लपण आहे. वाढत्या ऊस शेतीमुळे बिबट्यांचे देखील प्रमाण वाढले आहे.
शेतात काम करताना खाली वाकून काम करू नये. खाली वाकल्यामुळे आपण बिबट्याच्या नजरेच्या टप्प्यात येतो व तो आपल्याला प्राणी समजून आपल्यावर हल्ला करू शकतो.
- श्री. योगेश घोडके, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनविभाग, ओतूर