अचानक दार बंद झाले अन दाेन चिमुकल्या अडकल्या घरात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 04:04 PM2019-01-07T16:04:57+5:302019-01-07T16:06:26+5:30
दरवाजाचे लॅच लागल्याने दाेन चिमुकल्या फ्लॅटमध्ये अडकल्या हाेत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी लॅच ताेडून त्यांची सुटका केली.
पुणे : खेळता खेळता घराच्या दरवाज्याचे लॅच लागल्याने दाेन चिमुकल्या फ्लॅटमध्ये अडकल्या. अग्निशमन दलाला याची माहिती मिळताच जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दीड तासानंतर त्या दाेन चिमुकल्यांची सुटका करण्यात अग्निशमन दलाला यश आले.
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास उंड्री- पिसाेळी येथील स्काय हाईट या आठ मजली इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये 3 वर्षाच्या दाेघी जुळ्या बहिणीअडकल्या. त्यावेळी त्यांची घराच्या बाहेरच्या बाजूस हाेती. खेळता खेळता दरवाजा लागल्याने त्या दाेघी फ्लॅटमध्ये अडकून पडल्या. याबाबतची माहिती अग्निशमन दलाला मिळताच काेंढवा अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घराच्या रचनेबाबत त्यांच्याकडून माहिती घेतली. सुरुवातील टेरेसवरुन घरात प्रवेश करता येताे का याचा अंदाज घेतला. परंतु इमारत उंच असल्यामुळे ते शक्य झाले नाही. त्यानंतर स्प्रेडर या उपकरणाच्या मदतीने दरवाजाचे लॅच ताेडण्यात आले आणि मुलींना सुखरुप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले. मुलींना सुखरुप पाहून त्या मुलींच्या आईने व इतर रहिवाश्यांनी जवानांचे आभार मानले.
या कामगिरीमधे कोंढवा अग्निशमन केंद्राचे चालक सतीश देशमुख व जवान तांडेल तसेच कैलास शिंदे, रफिक शेख, राहूल जाधव, पंकज ओव्हाळ, राहुल गायके या जवानांनी सहभाग घेतला.