नांदेड फाट्याजवळ मर्डरप्रकरणी दोन मुख्य आरोपींना सोलापुरातून घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 10:34 AM2022-03-31T10:34:18+5:302022-03-31T10:37:44+5:30
हवेली पोलिसांची कामगिरी...
धायरी: सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळ मारुती लक्ष्मण ढेबे या तरुणाची सात जणांनी कोयत्याने सपासप वार करुन हत्या केली होती. यातील मुख्य सूत्रधार दादा चव्हाण व राज जाधव ( दोघेही राहणार: गोसावी वस्ती, नांदेड, सिंहगड रस्ता, पुणे) अशी या दोघांची नावे आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मारुती ढेबे व आरोपी यांच्यात पूर्वीचा जुना वाद होता. त्या वादातून आरोपींनी मारुतीचा काटा काढायचा ठरवले. २३ मार्चला मारुती हा नांदेड फाट्यापासून नांदेड गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला लागून असलेल्या बालाजी स्क्रॅप सेंटर या दुकानात बसलेला होता. त्यावेळी तोंडाला रुमाल बांधून आलेल्या सहा जणांनी त्याच्यावर अचानक कोयत्याने हल्ला केला. या टोळक्याने मारुती ढेबेवर कोयत्याने सपासप वार केले. त्यात ढेबे याचा जागीच मृत्यू झाला.
हत्या केल्यानंतर हल्लेखोर कारने पसार झाले होते. घटनेनंतर त्याच दिवशी याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना हवेली पोलीसांनी ताब्यात घेतले होते. तर यातील दोन फरार अमोल अर्जुन शेलार व अभिजित राम गंगणे या दोन आरोपींना रांजणगाव येथील लॉजवरून पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली होती.
यातील तीनजण हे अद्यापपर्यंत फरार होते. दरम्यान यातील दोन मुख्य आरोपी हे दर्शनासाठी बालाजीला गेले असल्याची माहिती हवेली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले, पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम, सहाय्यक फौजदार प्रदीप नांदे, पोलीस अंमलदार निलेश राणे, विलास प्रधान यांनी गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सोलापूर रेल्वे स्थानकावर सापळा रचून मोठ्या शिताफीने दोघांना ताब्यात घेतले. ते दोघेही पुढे मुंबईला पळून जाण्याचा बेतात असतानाचा पोलीसांनी दोघांना ताब्यात घेतले.
मुख्य सूत्रधार सराईत गुन्हेगारच...
खून झालेला मारुती ढेबे हाही सराईत गुन्हेगार होता. मागील वर्षी नांदेड गावातील एका तरुणावर त्याने व त्याच्या काही साथीदारांनी तलवार व कोयत्यांनी जीवघेणा हल्ला केला होता. त्यातून तो तरुण थोडक्यात बचावला होता. मयत मारुती ढेबे याच्यावर हवेली पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दहशत पसरवणे, मारहाण करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी दादा चव्हाण व राज जाधव यांच्यावरही यापूर्वी विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.