सामाजिक द्वेष पसरविणार्या अॅडमिनसह दोघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 11:59 AM2020-04-05T11:59:47+5:302020-04-05T12:00:57+5:30
समाजिक द्वेष पसरवणारी पाेस्ट टाकल्या प्रकरणी पुण्यातील एका व्हाॅट्सअप ग्रुपच्या अॅडमिनसह दाेघांवर गुन्हा दाखल केला आहे.
पुणे : इतर समाजाच्या नागरिकांकडून भाजी खरेदी करु नये, तसेच त्यांना आपल्या गल्लीत येऊ देऊ नका, अशा आशयाची व्हाटसअप ग्रुपवर पोस्ट टाकून सामाजिक द्वेष पसरविणार्या सदस्यासह ग्रुप अॅडमिनवर देखील निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सुशीलकुमार सिमरुराम खैरालिया (वय ५४) आणि अमित मनोज भालेराव (वय ३३, दोघे ही रा. ओटा स्कीम, निगडी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.याप्रकरणी पोलीस कर्मचारी विकास निलचंद दुधे यांनी निगडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित भालेराव हा अमित भालेराव मित्र परिवार या ग्रुपचा अॅडमीन आहे. तर सुशीलकुमार हा त्या ग्रुपचा सदस्य आहे. सुशीलकुमार याने या व्हाटसअॅप ग्रुपवर विशिष्ट धर्माच्या नागरिकांकडून साहित्य खरेदी करु नका. त्यांना आपल्या गल्लीमध्ये येऊ देऊ नका अशी समाजात द्वेषभावना पसरविणारी पोस्ट टाकली.
या पोस्टला ग्रुप अॅडमीनही जबाबदारी धरुन दोघांवर पोलिसांनी भारतीय दंडविधान कलम १५३ (अ) (ब) नुसार गुन्हा दाखल केला आहे. यामुळे आता प्रत्येक ग्रुप अॅडमिनने आपल्या ग्रुपवर अशा कठीण परिस्थितीत कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट कोणी टाकणार नाही, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.