पुणे मेट्रोची दोन स्थानके पुणेरी पगडीच्या आकारात!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 04:15 AM2019-01-29T04:15:14+5:302019-01-29T06:47:46+5:30
२ हजार कोटींचे कर्ज मंजूर : डिसेंबरमध्ये रेल्वे धावणार
- विश्वास खोड
नवी दिल्ली : पुणेमेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी फ्रान्सच्या बँकेचे २ हजार कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. नदीजवळची डेक्कन जिमखाना आणि संभाजी पार्क ही स्थानके पुणेरी पगडीच्या आकारात असतील, ही स्थानके पेठ व पुण्याच्या नव्या भागाला जोडणारी असतील. मेट्रोमुळे पुण्याची नवी ओळख जगाला होईल, अशी माहिती महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सोमवारी दिली.
दीक्षित म्हणाले की, ‘पुणे मेट्रो प्रकल्पासाठी २ हजार कोटींचा करार होणे हा आज ऐतिहासिक क्षण आहे. यानंतर ४ हजार कोटींच्या कर्जाचा करार पुढच्या महिन्यात होईल. युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेसोबत तो करार केला जाईल. एकूण ११ हजार ४०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. त्यातून सुमारे ६ हजार कोटी रुपये कर्जातून येतील. अन्य खर्च केंद्र व महाराष्ट्र सरकार उचलेल. पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकाही वेगळ्या स्वरुपात खर्च उचलणार आहेत. तो इक्विटी फायनान्सच्या आणि जमिनीच्या स्वरुपात सहभागी आहे.’ मेट्रो रेल्वे २०२०-२०२१ पर्यंत सुरू करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. डिसेंबर २०१९ पासून पहिला टप्पा सुरु करता यावा असा आमचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले.
ठाणे, नाशिकमध्येही मेट्रो?
नागपूर व पुण्यानंतर आणखी कोणती शहरे महामेट्रोच्या दृष्टिपथात आहेत, असे विचारले असता दीक्षित म्हणाले की, ठाणे महानगरपालिकेने मेट्रोचा प्रकल्प तयार करण्याची जबाबदारी आम्हाला दिली होती. त्याचा आराखडा आम्ही दिला आहे. नाशिक शहरामध्येही मेट्रो रेल्वेचा प्रकल्प अहवाल बनविण्याच्या सूचना महाराष्ट्र सरकारने केल्या होत्या. तो लवकरच दिला जाईल.