दोन महिन्यांत मद्यविक्रीत २७ टक्क्यांनी घट
By admin | Published: June 28, 2017 04:16 AM2017-06-28T04:16:35+5:302017-06-28T04:16:35+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांपासून पाचशे मिटरच्या आतील मद्यविक्री बंद करण्यात आल्यानंतर
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांपासून पाचशे मिटरच्या आतील मद्यविक्री बंद करण्यात आल्यानंतर एप्रिल व मे या दोन महिन्यात जवळपास २७ टक्क्यांनी विक्री घटली आहे. देशी-विदेशी मद्यासह बिअर आणि वाईनचा खपही खाली आल्याचे अधीक्षक मोहन वर्दे यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची १ एप्रिलपासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यापासून नव्या आर्थिक वर्षात उत्पादन शुल्क वाढण्याची शक्यता गृहीत धरून मद्यविक्रेत्यांनी अतिरिक्त साठा करून घेतला होता. त्याचे उत्पादन शुल्कही दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार आदी आस्थापनांनी भरले होते. त्यामुळे एप्रिलमध्ये खप वाढल्याचे दिसत होते. मात्र, हा फुगवटा असल्याचे मे महिन्यामध्ये लक्षात आले. प्रत्यक्षातील मद्यसाठा आणि विक्रीचा टक्का यामध्ये तफावत असल्याचे निदर्शनास आले. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये मिळून ३२ लाख १९ हजार लिटर देशी मद्य, ४१ लाख ८४ हजार लिटर विदेशी मद्य, ९१ लाख ३६ हजार लिटर बिअर, आणि १ लाख २७ हजार लिटर वाईनची विक्री झाली आहे.