दोन्ही महिने पुणेकरांसाठी ‘ताप’दायक, रुग्णांच्या संख्येत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 02:24 AM2018-10-01T02:24:27+5:302018-10-01T02:24:56+5:30
रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ : स्वाइन फ्लू, डेंग्यूचा ‘ताप’ कायम
पुणे : शहरातील स्वाइन फ्लू, डेंग्यू व चिकनगुनियाची स्थिती सप्टेंबर महिन्यातही कायम राहिली. आॅगस्ट महिन्यापासून रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. या महिन्यातही त्यात बदल झालेला नाही. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार २९ सप्टेंबर रोजी स्वाइन फ्लूची लागण झालेले १०७ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत, तर ८३ जणांना डेंग्यू व ६८ जणांना चिकनगुनियाची लागण झाली आहे. आॅगस्ट महिन्याच्या तुलनेत रुग्णांची संख्या जवळपास तेवढीच आहे.
शहरात जुलै महिन्यापासून साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. प्रामुख्याने स्वाइन फ्लू व डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. तसेच ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी अशी या आजारांची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्याही जास्त आहे. आॅगस्ट महिन्यामध्ये दोन्ही आजारांचा फैलाव वेगाने झाला. आॅगस्ट महिन्यात स्वाइन फ्लूने सात जणांचा बळी घेतला, तर सप्टेंबर महिन्यात १३ जण दगावले. त्यामुळे पुणे शहरातील एकूण मृतांचा आकडा २० वर गेला आहे. दोन्ही महिने पुणेकरांसाठी ‘ताप’दायक ठरले आहेत.
डेंग्यूचा ‘ताप’ सप्टेंबर महिन्यातही कायम राहिला आहे. आॅगस्ट महिन्यात ९३ जणांना डेंग्यूची लागण झाली होती. २९ सप्टेंबरपर्यंत हा आकडा ८३ पर्यंत पोहोचला आहे. तर ४७९ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. चिकनगुनियाची लागण झालेल्या रुग्णांचा सप्टेंबर महिन्यातील आकडा ६८ एवढा आहे. आॅगस्ट महिन्यात या आजाराचे ७० रुग्ण आढळले होते. ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, अंगावर लाल चट्टे अशी लक्षणे असलेल्या रुग्णांचे रुग्णालयांमध्ये येण्याचे प्रमाण अद्यापही ओसरलेले नाही.
स्वाइन फ्लू रुग्णांची स्थिती
दिनांक तपासणी टॅमी फ्लू नमुना लागण रुग्णालयात
दिल्या तपासणी उपचार
१ सप्टेंबर ३४६१ ८९ १९ ९ ३२
२९ सप्टेंबर ५२३० २१२ ८ ८ १०७
१ जानेवारी ६,८८,८०० ९९४२ १३३७ २५३ १०७
डेंग्यू व चिकनगुनिया रुग्णांची स्थिती
आॅगस्ट २९ सप्टेंबरपर्यंत
डेंग्यू संशयित ५८९ ४७९
डेंग्यू लागण ९३ ८३
चिकनगुनिया लागण ७० ६८
महापालिकेच्या अहवालानुसार १ सप्टेंबर रोजी स्वाइन फ्लूची लागण झालेल्या ३२ रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू होते. हा आकडा २९ सप्टेंबर रोजी १०७ वर गेला आहे. त्यापैकी ४७ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. आॅगस्ट महिन्याच्या तुलनेत व्हेंटिलेटर व उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे.