गोळीबारप्रकरणी आणखी दोन आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:12 AM2021-05-19T04:12:42+5:302021-05-19T04:12:42+5:30
पिंपरी : गोळीबार प्रकरणानंतर पिंपरी व निगडी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यात निगडीतील दोन गुन्ह्यांमधील ...
पिंपरी : गोळीबार प्रकरणानंतर पिंपरी व निगडी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यात निगडीतील दोन गुन्ह्यांमधील आणखी दोन आरोपींना मंगळवारी (दि. १८) बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. यापूर्वी चार जणांना अटक केली आहे. साजिद मेहबूब शेख (वय २१, रा. मोरेवस्ती, चिखली) आणि रोहित अशोक कुसाळकर (वय २०, रा. रामनगर, चिंचवड), अशी मंगळवारी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. रोहित उर्फ सोन्या गोरख भोसले (वय २०, रा. दळवीनगर, चिंचवड), सुलतान इम्तियाज कुरेशी (वय २०), रुतिक ऊर्फ भावड्या लक्ष्मण वाघमारे (वय २०, दोन्ही रा. आनंदनगर, चिंचवड), आतिष महादेव जगताप (वय २१) या आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीतील आमदार अण्णा बनसोडे यांनी बुधवारी (दि. १२) काळभोरनगर, चिंचवड येथे आपल्यावर गोळीबार झाल्याचा दावा केला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. याप्रकरणी आमदार समर्थकाने दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आमदार बनसोडे व कार्यकर्त्यांच्या दिशेने गोळीबार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले. मात्र, याच्या परस्पर विरोधी तक्रार करण्यात आली. त्यात आमदारपुत्र सिद्धार्थ बनसोडे याच्यासह त्याच्या साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचे दोन गुन्हे दाखल केले.
आमदारपुत्राचा फोन ‘स्विच ऑफ’
गोळीबार प्रकरणानंतर गुन्हे दाखल होऊन सहा ते सात दिवस झाल्यानंतरही त्यात आरोपी असलेला आमदारपुत्र सिद्धार्थ बनसोडे याला अटक करण्यात आलेली नाही. याबाबत पत्रकारांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना प्रश्न विचारला. आमदारपुत्राचा फोन स्विच ऑफ असून, गुन्ह्यात कोणाचीही हयगय करण्यात येणार नाही, असे कृष्ण प्रकाश यांनी सांगितले. तसेच या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.