पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये ‘कोरोना’च्या तपासणीसाठी आणखी दोन जण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 08:24 PM2020-01-29T20:24:17+5:302020-01-29T20:34:08+5:30
पुण्यातील रूग्णालयात निरीक्षणाखाली असलेल्यांपैकी तीन प्रवाशांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह
पुणे : चीनहून आलेल्या आणखी दोन जणांना मंगळवारी ‘कोरोना’च्या तपासणीसाठी नायडू रूग्णालयात दाखल केले आहे़. या दोघांच्याही घशातील द्रव पदार्थाचे नमुने एनआयव्ही (राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था)मध्ये तपासणीसाठी पाठविले आहेत. सद्यस्थितीला या रूग्णालयात एकूण चार जणांना निरिक्षणाखाली ठेवले असून, यापैकी तीन जणांची तपासणी ही निगेटिव्ह आली असून एक जणाचा निदान अहवाल गुरूवारी प्राप्त होणार आहे.
पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख रामचंद्र हंकारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनसहकोरोना चा प्रादुर्भाव झालेल्या भागातून पुण्यात आलेल्या प्रवाशांची संख्या आजमितीला चार असून आहे. यापैकी दोन जणांची घशातील द्रवपदार्थाचे नमूने दोनदा एनआयव्हीद्वारे तपासले आहेत. या दोन्ही तपासण्यांमध्ये त्यांना कोरोनाची लागण नसल्याचे निष्पन्न झाले आहे. या दोघांसह मंगळवारी आलेल्या एका प्रवाशाचे व बुधवारी सकाळी आलेल्या एका प्रवाशास नायडू रूग्णालयात तपासणीसाठी ठेवले आहे. या दोघांच्याही घशातील द्रवपदार्थाचे नमूने आज एनआयव्हीकडे पाठविले आहेत. यापैकी एका प्रवाशाचा तपासणी अहवाल आला असून, तो निगेटिव्ह आहे. त्यामुळे आणखी एकदा तपासणी झाल्यावर संबंधित तीन जणांना रूग्णालयातून सोडणार आहे.
कोरोना विषाणूचा उद्रेक चीन देशातील वुहान या शहरात झाल्याचे चीनने ३१ डिसेंबर,२०१९ रोजी जाहिर केले होते. त्यानंतर चीनच्या इतर शहरासह जपान, थायलंडसह १४ देशांमध्ये या आजाराचे रूग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर या आजाराचा प्रादुर्भाव भारतात होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.२८ जानेवारीपर्यंत विमानतळावरील स्क्रिनिंग आणि क्षेत्रिय पातळीवरील सर्व्हेक्षण यातून बाधित भागातून आलेले महाराष्ट्रातील २३ प्रवासी आढळले आहेत. यापैकी १० प्रवाशांना सौम्य सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळल्याने त्यांना विलगीकरण (कोरोना तपासणीसाठीच्या) कक्षात भरती केले आहे. या प्रवाशांपैकी ६ जण मुंबईत, २ पुण्यात व नांदेड येथे १ जण भरती आहे. आज पुण्यात नव्याने २ जणांना भरती केले असून, पुण्यातील रूग्णालयात निरिक्षणाखाली असलेल्यांपैकी तीन प्रवाशांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आहेत.