पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर आणखी दोन बोगदे, आठ पदरीसाठी अडीच हजार कोटी
By नितीन चौधरी | Published: September 22, 2023 06:07 PM2023-09-22T18:07:10+5:302023-09-22T18:08:29+5:30
बोगद्यासाठी १६० हेक्टर जमीन...
पुणे :पुणेमुंबई एक्सप्रेस वेवरील सध्याची वाहनांची वाढती संख्या तसेच भविष्यात होणारी वाढ लक्षात घेऊन सहा पदरी असलेला मार्ग आठ पदरी करावा लागणार आहे. त्यासाठी बोरघाटात आणखी दोन बोगदे करण्यात येणार आहेत. हा सुमारे अडीच हजार कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव येत्या वर्षाअखेर मंजुर होईल अशी अपेक्षा राज्य रस्ते विकास महामंडळाला आहे.
मिसिंग लिंक अंतिम टप्प्यात
मुंबईला जाण्यासाठी एक्सप्रेस वे हा वेगवान मार्ग असून जुन्या महामार्गावरून मुंबईला जाण्यासाठी चार ते पाच तासांचा असलेला प्रवास अवघ्या अडीच ते तीन तासांवर आला आहे. मात्र, सध्या हा मार्ग सहा पदरी आहे. त्यामुळे पुण्याहून मुंबईकडे अथवा मुंबईहून पुण्याकडे येजा करताना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रवासाला तीन तासांऐवजी नागरिकांना पाच तास किंवा त्याहून अधिक कालावधी लागत असल्याचे दिसून येते. ही कोंडी फोडण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने सुरू केलेला ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे.
वाहनांची संख्या वाढणार
एक्सप्रेस वेची वाहनांची क्षमता साठ हजार असली तरी सद्यस्थितीत या मार्गावरून दरदिवशी ८२ ते ८३ हजार वाहने धावतात. वाहनांची संख्या क्षमतेपेक्षा अधिक असल्याने आता लेन वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच येत्या काही वर्षांत नवी मुंबईच्या नव्या विमानतळामुळे वाहनांची संख्या वाढणार आहे. तसेच मिसिंग लिंकमुळेही प्रवाशांचा मुंबईला जाणारा वेळ वाचणार असल्याने वाहने आणखी वाढणार आहेत. त्यामुळे भविष्यात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन राज्य सरकारने एक्सप्रेस वे आता आठपदरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
रस्ते विकास महामंडळाने यासाठी सर्वंकष प्रकल्प अहवाल (डीपीआर) केला असून या प्रकल्पासाठी अडीच हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सध्याच्या महामार्गावर दोन्ही बाजूस प्रत्येकी एक मार्गिका वाढविण्यात येणार आहे. त्याचा प्रस्ताव सरकारला पाठविला आहे. डिसेंबरपूर्वी या प्रस्तावाला मान्यता मिळण्याची अपेक्षा आहे,’ अशी माहिती रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी दिली.
बोगद्यासाठी १६० हेक्टर जमीन
एक्सप्रेस वे आठ पदरी करताना गरजेनुसार आणखी दोन बोगदे करावे लागण्याची शक्यता आहे. सध्या ‘मिसिंग लिंक’च्या माध्यमातून उभारण्यात येणारे दोन बोगदे वाढीव क्षमतेसाठी पुरेसे असले तरी भविष्याचा विचार करता आणखी दोन बोगदे करण्याची चाचपणी रस्ते विकास महामंडळाकडून केली जाणार आहे. त्यासाठी सुमारे १६० हेक्टर क्षेत्र जमीन लागणार आहे. ही जमीन सध्या वन विभागाच्या ताब्यात असल्याने विविध परवानग्या घेऊन ती लवकर उपलब्ध होईल, अशी शक्यता आहे.
पुणे-मुंबई दरम्यानच्या प्रवाशांची आणि वाहनांची संख्या वेगाने वाढली आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी राज्य सरकारने हा महामार्ग आठ पदरी करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार प्रस्ताव सरकारला पाठविला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळताच सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम सुरू केले जाणार आहे.
- राहुल वसईकर, अधीक्षक अभियंता, राज्य रस्ते विकास महामंडळ