स्वाइन फ्लूचे आणखी दोन बळी
By admin | Published: February 14, 2015 11:52 PM2015-02-14T23:52:57+5:302015-02-14T23:52:57+5:30
स्वाइन फ्लूच्या बळींचे सत्र शहरात वेगाने वाढले असून, शनिवारी आणखी दोघांचा या आजाराने बळी घेतला. यामुळे अवघ्या दीड महिन्यात स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या १४ वर पोहोचली आहे.
पुणे : स्वाइन फ्लूच्या बळींचे सत्र शहरात वेगाने वाढले असून, शनिवारी आणखी दोघांचा या आजाराने बळी घेतला. यामुळे अवघ्या दीड महिन्यात स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या १४ वर पोहोचली आहे. दरम्यान, लागण झालेल्या ६ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तर, आज दिवसभरात स्वाइन फ्लूची लागण झालेले १२ नवे रुग्ण सापडले आहेत.
मृत्यू झालेल्यांपैकी ४० वर्षीय महिला पिंपरी-चिंचवड येथील केळेवाडी येथे राहणारी होती, तर २४ वर्षीय मुलगा येरवडा येथे राहणारा होता. या दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान या दोघांचा आज सकाळी मृत्यू झाला. या दोघांनाही स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे तपासणी अहवालातून स्पष्ट झाले होते. दोन दिवसांपूर्वीच दोघांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला होता.
दरम्यान, पुण्यात स्वाइन फ्लू झपाट्याने वाढू लागला असून राज्य शासनाच्या आरोग्य विभाग व पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याचे चित्र आहे. केवळ जनजागृतीवरच भर दिला जात आहे. त्याचा परिणाम होत नसल्याचे रुग्णांच्या वाढत्या संख्येवरून स्पष्ट होत आहे. आज दिवसभरात ९५९ जणांची स्वाइन फ्लूची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १४३ संशयितांना टॅमीफ्लू औषधे देण्यात आली. यांपैकी ३१ जणांच्या घशातील कफांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. लागण झालेले २९ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी दाखल आहेत. त्यापैकी ६ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले आहे. उपचारांनी पूर्णपणे बरे झालेल्या ९ जणांना आज रुग्णालयांमधून घरी सोडण्यात आले.
स्वाइन फ्लूच्या रुग्णांची शंभरी
४आज दिवसभरात स्वाइन फ्लूचे १२ नवे रुग्ण सापडल्याने या वर्षातील स्वाइन फ्लूच्या रुग्णांनी शंभरीचा आकडा गाठला.
४दि. १ जानेवारी ते १४ फेब्रुवारी २०१५ या दिड महिन्याच्या कालावधीत स्वाइन फ्लूचे तब्बल १०० रुग्ण शहरात सापडले आहेत. विशेष म्हणजे गेल्या पूर्ण वर्षभरात स्वाइन फ्लूचे केवळ ३५ रुग्णच सापडले होते.