तब्बल २५ गुन्हे दाखल असणारे दोन अट्टल गुन्हेगार अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 02:37 PM2021-03-17T14:37:52+5:302021-03-17T14:40:06+5:30
सापळा रचून गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना यश, १ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त,
लोणी काळभोर: केडगाव चौफुला नजीकच्या वाखारी ( ता. दौंड, ) येथे मारहाण करून लुटमार करणाऱ्या दोन सराईत अट्टल गुन्हेगारांना पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. दोन्ही गुन्हेगार रेकॉर्डवरील असून त्यांच्यावर तब्बल २५ चोरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.
याप्रकरणी सागर उर्फ सोन्या जालिंधर सुर्यवंशी ( वय २९, रा.केडगाव ) व अमोल उर्फ लखन विलास देशमुख ( वय २९, रा. खंडोबानगर) याला अटक करण्यात आली आहे.
गुन्हे अन्वेषण विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी रोजी दुपारी २ -३० वाजण्याच्या सुमारांस केडगाव चौफुला जवळील वाखारी गांवच्या हद्दीत ही घटना घडली आहे. सागर सुर्यवंशी व अमोल देशमुख यांनी रमेश शामजी कुछाडीया ( वय ३६, नवी मुंबई ) यांच्या गळ्यातील एक तोळा सोन्याची चैन, दोन तोळा वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट, दोन सोन्याच्या अंगठया, एक मोबाईल, रोख रक्कम १५ हजार रुपये असा एकुण १ लाख ४५ हजार रुपये किमतीचा ऐवज जबरदस्तीने काढून चोरून नेला. त्यावेळी कुछडीया यांनी आरडाओरड केला असता तेथे रस्त्याने जाणारे लोक आल्याने दोघे आरोपी पळून गेले होते. याबाबत दिलेल्या तक्रारीवरून यवत पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
दोन आरोपी हे पाटस, बारामती फाटा ता.दौड येथे त्यांच्याकडील सोन्याच्या अंगठ्या विकण्यासाठी येणार आहेत. ही माहिती गोपनीय खबऱ्यांमार्फत पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे आणि त्यांच्या हे पथकाने त्याठिकाणी सापळा रचला. सोन्याच्या अंगठ्या विकण्यासाठी दुचाकीवर येवून उभ्या असलेल्या सागर सुर्यवंशी व लखन देशमुख या दोन संशयितांना घेरून ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशी सांगण्यात आलेला मुद्देमाल दोन आरोपींकडे सापडला. त्यांनी हा जबरदस्तीने लुटल्याचे पोलिसांना सांगितले. हे दोघे यापूर्वीचे रेकॉर्डवरील सराईत अट्टल गुन्हेगार असून आरोपी सागर सुर्यवंशी याचेवर यापूर्वी यवत व भिगवण पोलीस स्टेशनला ३ जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तर अमोल देशमुख याच्यावर यापूर्वी पुणे, सोलापूर व सातारा जिल्हयात जबरी चोरी, खंडणी, पळवून नेणे, दुखापत, चोऱ्या असे एकूण २२ गुन्हे दाखल आहेत.