Pune News| 'तो' वाचला पण त्याला वाचवायला गेलेले दोघेजण बुडाले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2022 06:47 PM2022-10-01T18:47:48+5:302022-10-01T18:50:53+5:30
युवकाला वाचवण्यास धावून गेलेले दोघेजण बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे....
वडगाव कांदळी (पुणे): बोरी बुद्रुक (ता.जुन्नर) परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नदीपात्रात बंधाऱ्याच्या पाण्यात बुडत असलेल्या युवकाला वाचवण्यास धावून गेलेले दोघेजण बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. युवकाला वाचवण्यात यश आले मात्र त्यानंतर दोघेही या पाण्यात बुडण्याची घटना समोर आली आहे. दोघेजण कुकडी नदीच्या पाण्याच्या प्रवाहात बुडून वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हे दोघेजण बुडाल्याची घटना शनिवार (दि १) रोजी सकाळी ११ वाजण्याचे सुमारास घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बोरी बुद्रुक (ता.जुन्नर)येथील अनिल संदीप धुळे (वय- १७) हा युवक पोहण्यासाठी गेला असता तो बुडू लागला असल्याचे पाहून जवळच उभे असलेल्या अमोल संदीप धुळे (वय -१९) व बापू आनंदा धुळे (वय- ३५) या दोघांनी पाण्यात उड्या घेऊन वाचवण्याचा प्रयत्न केला. बापू धुळे यांनी अनिल धुळे याला पाण्याबाहेर काढून वाचवले, परंतु अमोल धुळे हा नदीच्या पात्रात बुडत असल्याचे पाहून त्याला वाचवायला गेले असता पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने बापु धुळे व अमोल धुळे पाण्याचा प्रवाह बेपत्ता झाले असून घटनास्थळी जुन्नर रेस्क्यु टीम दाखल झाली आहे. संध्याकाळी उशिरापर्यंत शोध कार्य सुरू होते.
गेल्या दोन महिन्यांपासून मुसळधार पाऊस चालू असल्याने ओढ्या नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी चालू असून ते सर्व पाणी कुकडी नदीला येत आहे. नदीवर कोणीही पोहायला जाऊ नयेल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. आळेफाटा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहायक पोलिस निरीक्षक सुनिल बडगुजर त्यांचे सहकारी, निमगावसावाचे मंडलाधिकारी नितीन चौरे, बोरी बुद्रुकच्या तलाठी शितल गर्जे यांनी तात्काळ भेट दिली.