घरफोडीप्रकरणी दोन जणांना अटक
By admin | Published: January 11, 2017 01:53 AM2017-01-11T01:53:14+5:302017-01-11T01:53:14+5:30
काळखैरेवाडी (ता. बारामती) येथील घरफोडीप्रकरणी दोन जणांना बारामती गुन्हे शोध पथकाने सापळा रचून अटक केली आहे.
बारामती : काळखैरेवाडी (ता. बारामती) येथील घरफोडीप्रकरणी दोन जणांना बारामती गुन्हे शोध पथकाने सापळा रचून अटक केली आहे.
१५ डिसेंबर २०१६ रोजी मध्यरात्री काळखैरेवाडी गावच्या हद्दीत मोरगाव-सुपे रस्त्यावर बांदलवस्ती येथे चोरीचा प्रकार घडला होता. येथील राजाराम शंकर भोंडवे यांच्या बंद घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने तोडून घरात प्रवेश केला. घरातील सोने, चांदीसह रोख रक्कम असा एकूण १ लाख २७ हजारांचा ऐवज घरफोडी करुन लंपास केला. या संदर्भात वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली होती. घरफोडीचा तपास बारामतीच्या गुन्हे शोध पथकाच्या वतीने सुरु होता. तपासादरम्यान , गुप्त बातमीदारामार्फत गुन्हे शोध पथकाला या घरफोडीबाबत माहिती मिळाली. हा गुन्हा बावकर ऊर्फ मयूर गोरख पवार (वय २२, धंदा मजुरी, रा. काळखैरेवाडी,ता. बारामती) याने त्याच्या इतर दोन साथीदारांसमवेत केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर बावकर याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने दोन साथीदारांमार्फत हा गुन्हा केल्याची कबुली दिली. गुन्ह्यामध्ये चोरीला गेलेल्या मालापैकी तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने नागनाथ अरुण कांबळे (रा. गोतंडी, वय ३६, ता. इंदापूर) याला विकले होते. ते दागिने जप्त करण्यात आले. ८४ हजार ३५० रुपये या दागिन्याची किंमत आहे. बावकरचे दोन साथीदार फरार आहेत.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस हवालदार शिवाजी निकम, बाळासाहेब भोई, संदीप मोकाशी, रविराज कोकरे, सुभाष डोईफोडे, संदीप कारंडे, तुषार सानप, सदाशिव बंडगर यांनी सापळा रचून आरोपींना पकडले. (प्रतिनिधी)