पत्ता विचारण्याच्या बहाण्याने लाखोंची चोरी करणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 07:11 PM2018-03-23T19:11:38+5:302018-03-23T19:11:38+5:30
व्यापा-यांस लॉजचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या खिशातील ४० हजार रुपयांची चोरी केली होती.
लोणी काळभोर : जामिनावर सुटलेले दोघे लोकांना लुटण्यासाठी बुलेट व होंडा युनिकॉर्न दुचाकीवरुन येवून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या हातात हात देवून, त्यांच्याशी झटपट करून, कुस्तीच्या डावाचा वापर करून खिशातील पैसे लुटणाऱ्या दोघांना पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने थेऊर फाटा येथे जेरबंद केले आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अक्षय भारत जगताप ऊर्फ काठाळे ( वय २०, रा. जयमल्हार कॉलनी, गोपाळपट्टी, मांजरी बुद्रुक, मूळ.बीड ) व प्रभू ऊर्फ आकाश बाळू धुमाळ ( वय २०, सध्या रा. रामोशी आळी, हडपसर, मूळ- जि. सोलापूर ) या दोघांना अटक केली आहे. या दोघांनी शिरूर, रांजणगांव, भिगवण येथील आठ ठिकाणी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एकट्या इसमाला गाठून ३ लाख ६ हजार रुपये रक्कम लुटल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी या दोघांनी गुन्ह्यात वापरलेली बुलेट ( क्र एमएच.१२. एलजी ९१९२ ) व होंडा युनिकॉर्न क्र. एमएच १२ पीजी ९१९३) या दोन दुचाकी जप्त केल्या असून त्यांच्याकडून लुटमार केलेल्या रक्कमेपैकी २ लाख ५० हजार रुपये हस्तगत केले आहेत.
शिरूर येथील कपिल ट्रेडर्स या दुकानासमोर १९ नोव्हेंबर २०१७ बुलेट मोटारसायकल वरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी कपिल सुरेश बोरा ( रा. शिरूर ) या व्यापा-यांस लॉजचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या खिशातील ४० हजार रुपयांची चोरी केली होती. त्यानंतर शिरूर येथील माणिकचंद हॉस्पिटल समोर, रामआळी, पाबळफाटा, डंबेनाला, इंदिरा गांधी पुतळा चौक, रांजणगांव येथे गजानन हॉस्पिटल समोर व भिगवण येथे बुलेट व होंडा युनिकॉर्न दुचाकीवरुन येवून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या खिशातील रोख रक्कम घेऊन पोबारा केल्याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.
शिरूर शहरात भरदिवसा या घटना घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या गुन्हेगारांचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते. सदर गुन्हे गंभीर स्वरूपाचे असल्याने ते उघडकीस आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेझ हक, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या पथकाची नियुक्ती केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , यापूर्वी पुणे शहर परिसरात याप्रकारचे गुन्हे केलेले व जामिनावर बाहेर असलेल्यांची माहिती मिळवली असता त्यांना पुणे शहर हद्दीतील मार्केटयार्ड, सहकार नगर, लष्कर, भारती विद्यापीठ, भोसरी, चंदननगर या पोलीस ठाण्यात अशाप्रकारचे १२ गुन्हे दाखल असलेले लक्षात आले. या गुन्ह्यात जामिनावर बाहेर असलेले जगताप व धुमाळ यांचे फोटो गुन्हे घडलेल्या सीसीटिव्ही फुटेज मधील फोटोशी जुळत असल्याने पथकाने त्यांचा माग काढण्यास सुरूवात केली. दोघे गुरूवारी ( २२ मार्च ) रोजी थेऊर फाटा येथे आले असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्यांना जेरबंद केले.पुढील तपासासाठी दोघांना शिरूर पोलिसांचे ताब्यात देण्यात आले आहे.