येरवड्यातील युवकाच्या खूनप्रकरणी दोन जण ताब्यात, विधिसंघर्षग्रस्त बालकाचा आरोपींमध्ये समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 01:21 PM2018-04-19T13:21:07+5:302018-04-19T13:21:07+5:30
किरकोळ कारणावरून झालेल्या वादात दोघा मित्रांनी मिळून निखील श्रीकांत कडाळे याच्या डोक्यात दगड घालून मंगळवारी रात्री खून केला होता.
विमाननगर - येरवडा मेंटल कॉर्नर समोरील मैदानात मंगळवारी रात्री झालेल्या खून प्रकरणी येरवडा पोलिसांनी गुरुवारी सकाळी दोघांना ताब्यात घेतले . किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दोघा मित्रांनी मिळून निखील श्रीकांत कडाळे (वय २३ रा. पंचशीलनगर, येरवडा) यांच्या डोक्यात दगड घालून खून केला होता. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अजिंक्य विजय कांबळे (वय २२रा.पंचशील नगर येरवडा ) व एका विधीसंघर्ष बालकास ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजिंक्य व त्याचा दुसरा मित्र हे निखिलचे मित्र आहेत.मंगळवारी रात्री उशिरा हे तिघेजण कॉमर्स झोन समोरील मोकळ्या मैदानात दारू पित होते.यावेळी त्यांची किरकोळ कारणावरून वादावादी झाली. त्यातून चिडून अजिंक्य त्याच्या साथीदाराने निखिल यांचा बिअरच्या बाटलीने गळा चिरून व डोक्यात दगड घालून खून केला. खून करून दोघे फरारी झाले होते. बुधवारी सकाळी निखिलचा खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला. येरवडा पोलिसांनी तत्काळ गुन्ह्याचा तपास सुरू केला होता .या गुन्ह्यातील फरार आरोपींना शोधण्यासाठी एक विशेष पथक तैनात करण्यात आले होते . गुरुवारी सकाळी या दोघांना या पथकाने ताब्यात घेतले. दोघांनी निखिलचा खून केल्याची कबुली दिली आहे . परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त दीपक साकोरे, सहायक पोलीस आयुक्त गणेश गावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद महाजन, पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास केला.