चाेरांचा अजब फंडा ; एक कार चाेरल्यावर दुसरी घटनास्थळीच साेडून फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 09:29 PM2019-02-11T21:29:51+5:302019-02-11T21:36:58+5:30
चोरीच्या इको गाडीने पाठलाग करीत कार अडवून तलवारीच्या धाकाने नवीकोरी स्विफ्टकार चोरुन नेल्याची धक्कादायक घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
विमान नगर : चोरीच्या इको गाडीने पाठलाग करीत कार अडवून तलवारीच्या धाकाने नवीकोरी स्विफ्टकार चोरुन नेल्याची धक्कादायक घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. चालकाने प्रसंगावधान राखून या घटनेची माहिती पोलिसांना दिली. मात्र तोपर्यंत चोरट्यांनी कारसह पिंपरीच्या दिशेने पलायन केले. रामदास गोरख ठोकळ (वय ३२,रा. धानोरीरोड विश्रांतवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन येरवडा पोलिसांनी तीन अज्ञात चोरट्यांविरुध्द जबरीचोरीचा गुन्हा दाखल केला आहे. येरवडा पोलिसांच्या तीन पथकांसह गुन्हे शाखेची पथके या चोरी गेलेल्या कारसह चोरट्यांचा शोध घेत आहेत.
येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,रामदास ठोकळ हे खाजगी कंपनीत प्रवासी वहातूकीचे काम करतात. रविवारी रात्री त्यांच्या स्विफ्ट डिजायर कार क्र.(एम एच १२क्यूडब्लू ०२९४) ने कोथरूड येथून घरी परत येत असताना संगमवाडी पासून इको कार पाठलाग करत होती. मध्यरात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास इको कार त्यांच्या स्विफ्ट कारला डाँ.आंबेडकर काँलेज समोर आडवी घातली. इको मधून दोन इसम तलवार घेऊन बाहेर आले. त्यांना शिवीगाळ करुन धमकाऊन बळजबरीने कारमधून खाली उतरवले. त्यानंतर त्यांची कार घेऊन पोबारा केला. रामदास यांनी तात्काळ पोलीस नियंत्रनकक्षाला माहिती दिली. रात्रगस्तीचे अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक बलभिम ननावरे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. चोरी गेलेल्या कारचा पोलिसांनी माग घेतला,ती कार पिंपरीच्या दिशेने गेल्याचे समजले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
गंभीर बाब म्हणजे चोरट्यांनी आणलेली इको कार ही देखिल चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. ती कार चोरटे घटनास्थळी सोडून गेले. या गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी येरवडा पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली असून गुन्हे शाखा देखील समांतर तपास करीत आहे. अधिक तपास उपनिरीक्षक आनंदसिंह साबळे करीत आहेत.