चाकण येथील संग्रामदुर्ग किल्ल्यात युवकाचा खून, हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 10:28 PM2018-02-15T22:28:48+5:302018-02-15T22:29:08+5:30
चाकण येथील संग्रामदुर्ग भुईकोट किल्ल्याच्या आवारात एका अठरा वर्षाच्या युवकावर पूर्व वैमनश्यातून धारदार शस्राने वार करून व डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला.
चाकण - येथील संग्रामदुर्ग भुईकोट किल्ल्याच्या आवारात एका अठरा वर्षाच्या युवकावर पूर्व वैमनश्यातून धारदार शस्राने वार करून व डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली असून या हल्ल्यात दोनजण गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हि घटना आज ( दि. १५ ) आठ वाजण्याच्या सुमारास चाकण येथील संग्रामदुर्ग भुईकोट किल्ल्याच्या आवारात घडली. अनिकेत संदीप शिंदे ( वय १८, रा. चाकण, ता.खेड, जि. पुणे ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या हल्ल्यात ओंकार मनोज बिसणारे ( वय १७, रा.चाकण ) व आणखी एकजण गंभीर जखमी झाले आहेत. ओंकार वर येथील जयहिंद हॉस्पिटल मध्ये उपचार चालू असून दुसऱ्या जखमीचे नाव व उपचारासाठी नेण्यात आलेल्या हॉस्पिटलचे नाव अद्याप समजले नाही. अनिकेत हा गॅस रिपेअरिंगच्या दुकानात असताना काही तरुण आले व गोडीत बोलून किल्ल्याच्या आवारात नेले.
त्याठिकाणी या अनोळखी तरुणांनी त्याच्या चेहऱ्यावर, गळ्यावर धारदार शस्राने सपासप वार केले व डोक्यात दगड घालून हत्या केली. अनिकेतचा मृतदेह चाकण येथील ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.