खेड तालुक्यात चक्री वादळाने घर पडून घडलेल्या दुर्घटनेत मायलेकांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 06:30 PM2020-06-04T18:30:14+5:302020-06-04T19:02:41+5:30
मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाखांची मदत देऊ मिळवुन देणार माजी खासदार आढळराव पाटील यांचे आश्वासन
राजगुरुनगर: खेड तालुक्यात प्रश्चिम भागात चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला आहे. या चक्रीवादळात वाहगाव (ता. खेड ) येथे घराच्या भिंतीखाली सापडून मायलेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घर अंगावर पडून झालेल्या दुर्घटनेत पडुन मंजाबाई अनंता नवले (वय ६५ )यांचे निधन झाले होते. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेला त्यांचा मुलगा नारायण अनंत नवले (वय ३८) याचे गुरुवारी (दि. ४) सकाळी उपचारा दरम्यान निधन झाले. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. माजी खासदार आढळराव पाटील यांनी वहागाव येथे गुरुवारी दुपारी भेट देऊन या परिवाराचे सांत्वन केले.
चक्री वादळाने नुकसान झालेल्या नागरिकांना जास्तीत जास्त आर्थिक साहाय्य मिळावे अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याशी बोलुन केली आहे. तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे ही मदत तातडीने मिळविण्यासाठी आग्रह धरणार आहोत.याशिवाय वहागाव(ता. खेड )येथे भिंत कोसळून मयत झालेल्या मायलेक अशा दोन व्यक्तींना प्रत्येकी चार लाख रुपये मदत देण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याशी चर्चा केली आहे.ही शासकीय मदत देखील या कुटुंबातील वारसांना तात्काळ मिळवुन देऊ असा विश्वास माजी खासदार ,शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला.
खेड तालुक्यात झालेल्या चक्री वादळाने अनेक गावांत सार्वजनिक व इमारती, मालमत्ताचे नुकसान झाले. तत्पूर्वी चाकण येथे रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या कर्त्या व्यक्तीची भेट घेऊन त्यांना २५ हजार रुपयांची मदत आढळराव पाटील यांनी केली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, खेड बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर,परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे यावेळी उपस्थित होते. जिल्हा माजी सभापती अरुण चांभारे, सुखदेव पानसरे आदींनी वहागाव आणि नुकसान ग्रस्त भागात नागरिकांची भेट घेऊन दिलासा दिला. यावेळी पंचायत समिती सदस्य चांगदेव शिवेंकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शिवाजी वर्पे, गटविकास अधिकारी अजय जोशी, आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी भेट दिली. अधिकाऱ्यांना पंचनामा करण्यासाठी आदेश दिले.
तालुक्यातील नुकसानीची पाहणी व पंचनामे करून नुकसान शेतकरी व नागरिकांना शासनाने मदत करावी.तालुक्यातील खंडित वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा अशी मागणी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे केली.