जेव्हा कुंपणच शेत खातं...! गटशिक्षणाधिकाऱ्यासह दोन जण ५० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपतच्या जाळयात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 10:00 PM2021-09-01T22:00:14+5:302021-09-01T22:00:24+5:30
आरटीईनुसार मिळणाऱ्या प्रवेश यादीमध्ये नाव टाकण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेतली.
पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) मिळणाऱ्या प्रवेश यादीमध्ये नाव टाकण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने हवेली पंचायत समिती गट शिक्षणाधिकाऱ्यासह दोघांना अटक केली आहे.
गट शिक्षणाधिकारी रामदास शिवनाथ वालझाडे (वय ५०) आणि पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी विकास नंदकुमार धुमाळ (वय ४०) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. शिक्षण हक्क कायद्यानुसार मिळालेल्या प्रवेशाला कागदपत्रे तपासून ऑनलाईन मान्यता देण्यासाठी ही लाच त्यांनी घेतली आहे. हवेली पंचायत समितीच्या बाहेर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली. याप्रकरणी, दोघांच्या विरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. विकास धुमाळ याची हवेली पंचायत समितीकडून शालेय शिक्षण प्रवेशासाठी गठित करण्यात आलेल्या प्रवेश पडताळणी समितीचा सदस्य म्हणून पालक शिक्षक संघाचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. पारदर्शक कारभारासाठी धुमाळ यांची नेमणूक करण्यात आली होती. या कारवाईने कुंपणच शेत खात असल्याचे आढळून आले आहे.
तक्रारदार यांच्या मुलीचे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (आरटीई) अन्वये हडपसर येथे एका शाळेत लॉटरी पद्धतीने मिळणार्या प्रवेश यादीत नाव समाविष्ट करायचे होते. त्याकरीता कागदपत्रे तपासून ऑनलाईन मान्यता देण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. ही मान्यता देण्यासाठी आरोपी विकास धुमाळ याने गटशिक्षणाधिकारी वालझोडे यांच्यासाठी ५० हजारांची लाचेच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार ३१ ऑगस्ट रोजी पडताळणी करण्यात आली. त्यावेळी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार हवेली पंचायत समीतीच्या कार्यालयाबाहेर सापळा लावला होता. त्यावेळी धुमाळ याला लाच घेताना अटक करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक विजयमाला पवार अधिक तपास करीत आहेत.