नदीपात्रात विद्युत पंप ढकलण्यासाठी गेलेल्या दोघांचा विजेचा धक्का लागून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 03:50 PM2021-05-26T15:50:16+5:302021-05-26T16:48:49+5:30
जुन्नर तालुक्यामधील धोलवड येथील घटना
ओतूर: नदीपात्रात विद्युत पंप ढकलण्यासाठी गेलेल्या दोघांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. जुन्नर तालुक्यातील धोलवड जवळील जांभुळपट येथील नदी पात्रात मंगळवारी दुपारी ही घटना घडली. कौस्तुभ शंकर गंभीर ( वय ३० रा.खामुंडी, ता.जुन्नर) आणि आंतीराम गंधास भालेरा (रा. रा.खामुंडी, ता.जुन्नर) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. ओतूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असल्याची माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धोलवड येथील शेतकरी गणेश शिंगोटे यांचा विद्दुत प़ंप पाण्यात ढकलण्यासाठी अरुण शिंगोटे आणि कौस्तुभ गंभीर तेथे आले होते. त्यावेळी गणेश शिंगोटे व त्याचा मजूर आंतीराम भालेरा हे दोघेही तेथेच होते. कौस्तुभ गंभीर व आंतीराम भालेरा हे दोघे विद्दुत पंप ढकलण्यासाठी नदी पात्रात उतरले. विद्युत पंप ढकलून नेताना शेतकरी शिंगोटे हे विद्युत डी.पी. जवळ बसून होते. परंतु पंप ढकलताना त्या दोघांचा काहीच आवाज येईना. म्हणून नदीपात्रात जाऊन पाहिले असता दोघेही दिसले नाहीत. त्याच क्षणी शिंगोटे यांनी तेथील स्थानिक वायरमनला फोन करून बोलावून घेतले.
वायरमनसोबत व अन्य ग्रामस्थही नदीपात्राजवळ आले. त्यांचा शोध घेतल्यावर पात्रात दोघे बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. तपासणी साठी ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणल्यावर त्यांना मृत घोषित करण्यात आले. दोघांच्या मृतदेहाचे शवशवविच्छेदन करण्यासाठी पाठवले आहे. शवविच्छेदन केल्यानंतर मृत्यूचे कारण समजेल असे वैद्यकीय अधिकारी डॉ श्रीहरी सारोक्ते यांनी सांगितले.