वारजेत एकाच दिवसात दोन पिस्तुले जप्त; चौघे ताब्यात, दोन अल्पवयीन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 09:13 PM2023-08-29T21:13:55+5:302023-08-29T21:14:43+5:30
२ देशी पिस्तुले, ७ जिवंत काडतुसे आणि चार जणांना ताब्यात घेतले आहे...
वारजे (पुणे) : वारजे पोलिसांनी चमकदार कामगिरी करत एकाच दिवसात दोन ठिकाणी कारवाई करत २ देशी पिस्तुले, ७ जिवंत काडतुसे आणि चार जणांना ताब्यात घेतले आहे. त्यामधील दोन अल्पवयीनांचा समावेश आहे.
याप्रकरणी सूरज शिवाजी भरडे (वय २३ वर्षे, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, बुद्धविहाराशेजारी, राहुलनगर, शिवणे), अनिकेत अनुरथ आदमाने (वय २१ वर्षे, रा. पांडुरंग अपार्टमेंट, वारजे माळवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर आणखी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, ते अल्पवयीन आहेत. या अल्पवयीन बालकाकडून एक लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुन्हे प्रगटीकरण शाखेचे पथक गस्त घालत असताना, त्यांना पोलिस कॉन्स्टेबल श्रीकांत भांगरे यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराने
काही सराईत गुन्हेगार एकत्र उभे राहून काही खलबते करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तपास पथकाचे अधिकारी पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र मुंडे यांनी पोलिस नाईक प्रदीप शेलार, पोलिस कॉन्स्टेबल श्रीकांत भांगरे, विक्रम खिलारी व अजय कामठे यांच्यासोबत धनगरबाबा बसस्टॉपचे एनडीएच्या मैदानात सापळा रचून तेथे दोघा संशयित इसमांना ताब्यात घेतले. त्यांच्यापैकी सराईत गुन्हेगार सूरज शिवाजी भरडे (वय २३ वर्षे, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, बुद्धविहार शेजारी, राहुलनगर, शिवणे, पुणे) यांच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्टल व ४ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. तसेच त्याच्यासोबत असणाऱ्या अल्पवयीन बालकाकडून एक लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई सुरू असताना तपास पथकातील पोलिस कॉन्स्टेबल विजय भुरुक यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून आणखी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक विशाल मिंडे यांनी पोलिस नाईक अमोल राऊत, पोलिस कॉन्स्टेबल विजय भुरुक, अमोल सुतकर व राहुल हंडाळ यांनी वारजे स्मशानभूमीसमोरील पुलाखाली सापळा रचून दोन संशयित इसमांना ताब्यात घेतले. ही कामगिरी वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जैतापूरकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अजय कुलकर्णी यांच्या आदेशान्वये तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे, विशाल मिंडे, पोलिस नाईक प्रदीप शेलार, अमोल राऊत, पोलिस अंमलदार विजय भुरुक, श्रीकांत भांगरे, विक्रम खिलारी, अजय कामठे, अमोल सुतकर व राहुल हंडाळ यांनी केले आहे.
वारंवार कोम्बिंग तरीही...
पोलिस आयुक्तांच्या सूचनेनुसार इतर पोलिस ठाण्याप्रमाणे वारजेतदेखील वारंवार कोम्बिंग ऑपरेशन राबवूनही एकाच दिवशी दोन पिस्तुले मिळाल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे. आता कोम्बिंग अजून वाढवण्यास वाव आहे, असे नागरिकांमधून मत व्यक्त होत आहे.