दावडी खून प्रकरणातील ‘ त्या ’ दोन पोलिसांचे अखेर निलंबन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 08:12 PM2018-06-30T20:12:57+5:302018-06-30T20:23:34+5:30
दावडी येथे पीडित मुलीच्या भावावर चालत्या बसमध्ये कोयत्याने वार करत त्याचा निर्घृण खून करण्यात आला होता. तसेच मृतदेह ताब्यात घेण्यास संतप्त जमावाने नकार देत पोलिसांनी या प्रकरणात निष्काळजीपणा दाखविला असल्याचा ठपका ठेवला होता.
दावडी : दावडी येथील तरुणाच्या खूनप्रकरणी कर्तव्यामध्ये निष्काळजीपणाचा ठपका ठेवून खेड पोलीस ठाण्यामधील ‘त्या’ दोन पोलिसांचे अखेर निलंबन करण्यात आले. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी केली आहे. खेड तालुक्याच्या पूर्व भागात कार्यरत दावडी बीट पोलीस नाईक डी. वाय. सावंत, ए. डी. उबाळे या दोघांना निलंबित केले आहे. दावडी येथील आरोपी अजित भगवान कान्हुरकर हा एका पीडित मुलीला त्रास देत होता. वारंवार घरी येऊन मुलीला छेडणे, तिचे फोटो व्हॉट्सअॅपवर व फेसबुकवर पोस्ट करणे यामुळे खेसे कुटुंब त्रस्त झाले होते. याबाबत खेड पोलीस ठाण्यात दोन वेळा तक्रार दिली होती. मात्र, या प्रकरणाकडे या पोलिसांनी दुर्लक्ष करून आरोपीकडून कारवाई न करण्यासाठी आर्थिक व्यवहार केला होता. त्यामुळे आरोपीचे अजुनच फावले होते. पुन्हा पुन्हा पीडित मुलीचे फोटो व्हायरल करून या मुलीची व कुटुंबांची बदनामी करत होता. दरम्यान खेड पोलीस ठाण्यात आरोपी अजित यांच्याविरुद्ध (८ जून) रोजी फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला होता. आरोपी हा आमच्या मुलीला वारंवार त्रास देतो. त्याला अटक करा, समज द्या, अशी मागणी खेसे कुटुंबियाने पोलिसांकडे मागणी केली होती. मात्र पोलिसांनी कुठलीही कारवाई न केल्याने आरोपी मोकाट फिरत होता. गुन्हा दाखल केला म्हणून चिडून १२ जूनला सकाळी साडेसातला पीडित मुलीचा भाऊ श्रीनाथ सुदाम खेसे यांच्यावर चालत्या एसटी बसमध्ये कोयत्याने वार करून खून केला. श्रीनाथ यांच्या नातेवाईकांनी व दावडी गावातील ग्रामस्थांचा खेड पोलीस स्टेशन समोर मोठा जमाव जमला होता. पोलिसांनी आरोपीला लवकर पकडले असते तर श्रीनाथचा जीव गेला नसता, त्या पोलिसांना तत्काळ निलंबित करा, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका संतप्त झालेल्या नातेवाईक व ग्रामस्थांनी घेतली होती. सुमारे तीन तास श्रीनाथ यांचा मृतदेह पोलीस ठाण्यासमोरच होता. आरोपीला न पकडता आरोपीकडून या पोलिसांनी पैसे घेऊन मोकाट सोडले, त्यांना तातडीने निलंबित करा, अशा घोषणा स्टेशनसमोर देण्यात आल्या होत्या.
दरम्यान, अप्पर पोलीस अधिक्षक तेजस्विनी सातपुते यांनी खेड पोलीस ठाण्यात येऊन या प्रकरणाबाबत पोलीस कर्मचारी दोषी आढळले तर त्यांना निलंबित करण्यात येईल, असे आश्वासन संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांना दिले होते. पोलीस कर्तव्यावर होते, त्यांनी निष्काळजीपणा केला, असा ठपका चौकशी अहवालात ठेवण्यात आला होता. सदर प्रकरणाची चौकशी खेड उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे यांनी पूर्ण करून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्याकडे अहवाल सादर केला होता. या अहवालावरून ही कारवाई करण्यात आली आहे.