बघ्याची भूमिका घेणारे दोन पोलीस कर्मचारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:20 AM2021-02-28T04:20:25+5:302021-02-28T04:20:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : औंध परिसरात शस्त्रधारी चोरट्यांना पाहून पोलिसांनी पळ काढल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा पोलिसांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : औंध परिसरात शस्त्रधारी चोरट्यांना पाहून पोलिसांनी पळ काढल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा पोलिसांनी तडीपार गुंड रोशन लोखंडे सह अनेक जण हातात काेयते व पिस्तूल घेऊन नाच करत असताना बघ्याची भूमिका घेतल्याचे समोर आले आहे. तसेच हा प्रकार वरिष्ठ पोलीस अधिका-यांनाही कळविला नाही. याप्रकरणी पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी दोघा पोलीस कर्मचा-यांना निलंबित केले.
पोलीस शिपाई महेंद्र मोहन राऊत आणि सुशांत सतीश यादव अशी या दोन पोलीस कर्मचा-यांची नावे आहेत.
न-हेतील मानाजीनगर परिसरात १८ फेब्रुवारी रोजी तडीपार गुंड रोशन लोखंडे याने एका व्यक्तीला लुटले. त्यानंतर न-हेतील मार्तंड प्रतिष्ठान येथील सार्वजनिक रोडवर १५ साथीदारांसह रात्री ११ वाजता त्याने हातात कोयते, पिस्तूल घेऊन नाच केला. यामुळे परिसरात दहशत निर्माण करून नागरिकांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले. पोलीस कर्मचारी राऊत व यादव हे न-हे पोलीस चौकात असताना त्यांना हा प्रकार समजला. ते घटनास्थळी गेले. त्यावेळी त्यांनी आरोपींना थांबविण्याचा अथवा पकडण्याचा काहीही प्रयत्न केला नाही. एवढा गंभीर प्रकार असतानाही त्यांनी त्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिका-यांना दिली नाही.
या तडीपार गुंडांनी नंगानाच केल्याचा व्हॉट्सअॅप व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही बाब वरिष्ठांना समजली. त्यानंतर रोशन लाेखंडेसह काही जणांना पोलिसांनी अटक केली. या प्रकाराची चौकशी केल्यानंतर हा सर्व प्रकार राऊत व यादव यांना माहिती असल्याचे समोर आले. त्यांच्या या कृत्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाल्याने पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी दोघांना निलंबित केले.