Lalit Patil: ड्रग्ज तस्कर ललित पाटीलला पळून जाण्यात मदत करणारे दोन पोलीस बडतर्फ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 12:52 PM2024-07-04T12:52:03+5:302024-07-04T12:53:44+5:30
पोलीस हवालदार आदेश शिवणकर आणि पिराप्पा बनसोडे अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघे ललीत पाटील सोबत एक्सरे साठी गेलेच नसल्याचे चौकशीत समोर आले आहे...
पुणे : ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला ससून हास्पिटलमध्ये एक्स रे साठी घेऊन जाणारे आणि तो पळून गेल्याची माहिती नियंत्रण कक्षास तीन तास उशीरा देणाऱ्या दोन पोलिसांना शासकीय सेवेतून काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्याच्या गृह विभागाने या दोन पोलिसांना बडतर्फ केले आहे.
पोलीस हवालदार आदेश शिवणकर आणि पिराप्पा बनसोडे अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघे ललीत पाटील सोबत एक्सरे साठी गेलेच नसल्याचे चौकशीत समोर आले आहे. या शिवाय घटनेची माहिती तात्काळ नियंत्रण कक्षास दिली असती तर पळून गेलेल्या ललीत पाटील ला पकडता आले असते परंतु या दोघांनी वरिष्ठ अधिकारी तसेच नियंत्रण कक्षास न कळवल्यामुळे ललीत पाटील याला पळून जाण्यास वाव मिळाला असे चौकशीमध्ये निष्पन्न झाले आहे.
ड्रग तस्करीच्या गुन्ह्यात कारागृहात असताना आजारपणाचे नाटक करून ससून रुग्णालयात राहून ड्रग्ज तस्करीच्या व्यवसायात सक्रिय असणार्या कुख्यात ललित पाटील याच्यासह चौदा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तब्बल ३ हजार १५० पानांचे दोषारोपत्र दाखल केले होते. याप्रकरणी मोक्का न्यायालयाचे विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात हे आरोपपत्र दाखल झाले होते.
दोषारोपपत्राच्या माध्यमातून पुणे पोलिसांनी महत्त्वपूर्ण ठोस पुरावे जप्त केले होते. ड्रग्ज प्रकरणात मोक्का लागून दाखल झालेले हे पहिले आरोपपत्र असल्याचे बोलले जात आहे. ड्रग्ज तस्करीतील मास्टर माईंड ललित अनिल पाटील (३७, रा. नाशिक), अरविंद कुमार प्रकाशचंद्र लोहरे (रा. मुंबई, मूळ रा. उत्तरप्रदेश), अमित जानकी सहा उर्फ सुभाष जानकी मंडल (२९, रा. पुणे), रौफ रहीम शेख (१९, रा. ताडीवाला रोड, पुणे), भूषण अनिल पाटील (३४, रा. नाशिक), अभिषेक विलास बलकवडे (३६, रा. नाशिक), रेहान उर्फ गोलू आलम सुलतान मोहम्मद अन्सारी (२६, रा. मुंबई, मूळ रा. उत्तरप्रदेश), प्रज्ञा अरुण कांबळे उर्फ प्रज्ञा रोहित माहीरे (३९, रा. नाशिक), जिशान इक्बाल शेख (रा. नाशिक), शिवाजी अंबादास शिंदे (४०, रा. नाशिक ), राहुल पंडित उर्फ रोहित कुमार चौधरी उर्फ अमित कुमार (३०, रा. विरार, मूळ रा. बिहार), समाधान बाबूराव कांबळे (३२, रा. मंठा, जि. जालना), इमरान शेख उर्फ आमिर अतिक खान (३०, रा. धारावी), हरिश्चंद्र उरवादत्त पंत (२९, रा. वसई पालघर) यांच्यावर ड्रग्ज तस्करी प्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
दाखल दोषारोपपत्रानुसार, ससूनमध्ये ड्रग्जचे रॅकेट चालवत असताना पुणे पोलिसांनी कारवाई करत २ कोटी १४ लाखांचे ड्रग्ज जप्त केले होते. त्यानंतर ललित पळून गेल्यानंतर या गुन्ह्याची व्याप्ती वाढली. या निमित्त अवैध पद्धतीने सुरू असलेले संपूर्ण ड्रग्ज जगत या कारवाईमुळे ढवळून निघाले. ससून सारख्या रुग्णालयातून अशा पद्धतीने रॅकेट चालवले जात असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर ससून रूग्णालयातील कर्मचारी, कर्तव्यावर असलेले पोलिस, कारागृह पोलिस, कारागृहातील डॉक्टरसह, ससून रूग्णालयातील डॉक्टरचा ललित पाटील याला पळून लावल्याप्रकरणी संबंध आला होता.